पुणे

पुणे : स्फोटकांनी खडक फोडणार! चांदणी चौकातील रस्त्याच्या कामाने घेतला वेग

अमृता चौगुले

ज्ञानेश्वर बिजले
पुणे : चांदणी चौक प्रकल्पाच्या कामाने दिवाळीनंतर पुन्हा वेग घेतला असून, सोमवारी मध्यरात्रीपासून खोदकामासाठी स्फोट करण्यास प्रारंभ करण्यात येत आहे. कोथरूडकडून वारजेकडे जाणार्‍या सेवा रस्त्याचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन दिवसांत तो वाहनचालकांना वापरासाठी खुला होणार आहे.

चांदणी चौकातून जुना पूल पाडल्यानंतर त्यालगतचे खडक फोडण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी दिवसाआड मध्यरात्री साडेबारा वाजता अर्धा तास वाहतूक थांबवून खडकामध्ये नियंत्रित स्फोट घडवून आणले जातात. ते दगड अन्यत्र हलविले जातात. त्याद्वारे महामार्गाच्या लेन वाढविण्यात आल्या. महामार्गावर मुंबईकडून सातार्‍याकडे जाण्यासाठी पाच लेन, तर सातार्‍याकडून मुंबईला जाण्यासाठी तीन लेन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या बर्‍याच प्रमाणात सुटली आहे. चांदणी चौकात पूर्वी चार लेन असल्यामुळे तेथे अनेक वर्षे वाहतूक कोंडीची समस्या होती. तेथे सध्या नऊ लेन उपलब्ध झाल्या आहेत. या ठिकाणी सेवा रस्त्यांसह 14 लेन असतील. त्या वेळी महामार्गासाठी सहा लेन, तर दोन्ही बाजूला सेवा रस्त्याच्या प्रत्येकी चार लेन करण्यात येणार आहेत. येत्या दीड महिन्यांत ते काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

भुयारी मार्गाचे विस्तारीकरण
कोथरूडकडून मुळशीकडे जाणार्‍या भुयारी मार्ग अरुंद आहे. त्याचे विस्तारीकरण करण्यासाठी तेथे खांब उभारणीचे काम सुरू आहे. त्यावर बसविण्यात येणार गर्डरही प्राधिकरणाने तयार ठेवले आहेत. त्याचवेळी सातारा रस्त्याने येणार्‍या रॅम्पचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या पंधरवड्यात ते पूर्ण होईल. वेदभवन येथील जागा मात्र मिळालेली नाही. तो वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे येथे बांधण्यात येणार्‍या दुसर्‍या नवीन भुयारी मार्गाने काम सुरू करता आलेले नाही.

सेवा रस्त्याचे काम आठवडाभरात
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार अभियंता भारत तोडकरी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत दैनिक 'पुढारी'ला सोमवारी माहिती देताना म्हणाले की, सध्या खोदकाम जमिनीच्या पातळीपर्यंत पोहचले आहे. येत्या आठ दिवसांत खोदकाम पूर्ण होईल. त्यानंतर चांदणी चौकातील सेवा रस्त्याचे डांबरीकरण व अन्य कामे हाती घेण्यात येतील.

सेवा रस्ते पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील उपनगराकडे जाणार्‍या वाहनांना स्वतंत्र मार्ग मिळेल. कोथरूडकडून वारजेच्या दिशेने जाणार्‍या सेवा रस्त्याच्या दोन लेन सध्या वापरात आहेत. शृंगेरी मठ येथील भूसंपादन गेल्या महिन्यात झाले. तेथे डांबरीकरण हाती घेण्यात आले आहे. त्याचवेळी डांबरीकरणही सध्या केले जात आहे. तेथील तिसरी लेन येत्या दोन दिवसांत वाहनचालकांसाठी खुली करण्यात येईल.

नवीन पुलाचे बांधकाम काही दिवसांत सुरू होणार
खोदकाम व सेवा रस्त्याची कामे पूर्ण केल्यानंतर चांदणी चौकातील पुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. सेवा रस्त्यालगत नवीन पुलाचे खांब उभारण्यात येतील. त्या खांबांच्या पायाचे खोदकाम सेवा रस्ते करतानाच हाती घेण्यात येणार आहे. हा नवीन पूल सहा लेनचा असेल. जुना पूल चार लेनचा होता. हा पूल बांधण्यासाठी सहा महिने लागणार आहेत. नवीन पुलानंतर बावधन, पाषाणमार्गे मुळशीकडे ये-जा करता येईल. तसेच, मुंबईकडे जाण्यासाठी स्वतंत्र रॅम्प उभारला असल्याने पाषाणवरून वाहनांना त्यामार्गे मुंबईकडे जाता येईल. बावधनकडून सातार्‍याकडे जाण्यासाठी बांधण्यात येणार्‍या रॅम्पचे राहिलेले दोन खांब सेवा रस्ता करताना बांधण्यात येणार आहेत.

SCROLL FOR NEXT