रस्तारुंदीकरणाचे काम संथगतीने; घोरपडी परिसरातील चित्र Pudhari
पुणे

रस्तारुंदीकरणाचे काम संथगतीने; घोरपडी परिसरातील चित्र

विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

मुंढवा: घोरपडी येथील भीमनगर ते भारत फोर्ज या रस्त्याचे रुंदीकरण महापालिकेकडून सुरू आहे. या कामामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच हे कामही संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

या रस्तारुंदीकरणात ज्या रहिवाशांच्या जागा जात आहेत, त्यांना अद्याप त्याची ताबापावती मिळालेली नाही. रुंदीकरण करताना विद्युत केबल नादुरुत झाली असून, ती उघडी ठेवल्याने नागरिकांना येथून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. रस्ता खोदताना नळकनेक्शन तुटली आहेत. संबंधित ठेकेदाराने ती पुन्हा जोडली.

मात्र, अनेकांना पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही, तर काहींचा पाणीपुरवठा पूर्ण बंद झाला आहे. या रस्त्याच्या कडेच्या ड्रेनेजलाइनवर चेंबर बसविले आहे. मात्र, चेंबरवर झाकणे बसवली नसल्याने या ठिकाणी रात्रीच्या वेळी पाय घसरून अपघात होण्याचा धोका आहे.

या समस्यांबाबत रहिवाशांनी महापालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र, योग्य उपाययोजना करण्याबाबत संबंधित ठेकेदाराकडून दिरंगाई होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. महापालिकेने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा रहिवासी किरण काळे, गणेश पाटील, भारती भखवाना, इक्बाल मंतूर, एस. पी. पिल्ले आदींनी दिला आहे.

विद्युत केबल नादुरुस्त झाली असेल, तर ती तत्काळ दुरुस्त केली जाईल. रस्तारुंदीकरणात जागा गेलेल्या नागरिकांना त्यांच्या जागेची ताबापावती लवकरच देणार आहो. रस्त्याचे काम पूर्ण होण्याअगोदर सर्वांचे नळकनेक्शन व्यवस्थित जोडून दिले जातील.
- मेघा लावंड, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT