पुणे

पिंपरी : दहशत पसरविण्यासाठी फोडली रस्त्यावरील वाहने

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : परिसरात दहशत पसरविण्यासाठी रस्त्यावर पार्क केलेल्या पंधरा वाहनांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 25) मध्यरात्री चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीत घडली. याप्रकरणी सुभाष भरत शिंदे (25, रा. आनंद नगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नरेश ऊर्फ कृष्णा भंडारी, आदित्य (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) आणि त्यांचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कामावरून आल्यानंतर शुभम चांदणे, मनोज खरात यांच्याशी गप्पा मारत होते. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास ते घरी जात असताना आरोपी रस्त्यावरील दुचाकींची कोयते आणि लोखंडी रॉडने तोडफोड करीत असल्याचे दिसून आले. आरोपी मोठ्याने ओरडून नागरिकांना शिवीगाळ करीत परिसरात दहशत पसरवित होते. दरम्यान, फिर्यादी यांना त्यांच्या आईचा फोन आला. फिर्यादी फोनवर बोलत असताना आरोपी नरेश भंडारी याने मफकोणाला फोन लावतोस, कोण तुझ्या मदतीला येतो, ते बघतोच असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ केली.

तसेच, आरोपी आदित्य याने तू पोलिसाला फोन करतो काय, असे म्हणून फिर्यादी यांच्या डोक्यावर कोयत्याचा वार केला. फिर्यादी यांनी तो वार हुकवला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी फिर्यादी यांचे मामा मदतीसाठी आले. आरोपी आदित्य याने फिर्यादी यांच्या मामाचे डोके, हात आणि पायावर कोयत्याने वार केला. पतीचा आवाज ऐकून फिर्यादी यांची मामी तेथे आली असता आरोपी नरेश याने त्यांनादेखील लोखंडी रॉडने मारुन जखमी केले. फिर्यादी यांचे शेजारी बबन गायकवाड तेथे आले असता आरोपी नरेश याच्या साथीदाराने त्यांच्या डोक्यातही सिमेंटचा गट्टू घातला.

त्यानंतर आरोपी हातातील शस्त्र हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत, कोण आमचे नादाला लागले तर जिवंत सोडणार नाही, असे म्हणून निघून गेले. याच्या परस्पर विरोधी नागम्मा मारुती भंडारी (40, रा. आनंदनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुभाष शिंदे आणि त्याचे इतर साथीदार (नाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागम्मा भंडारी यांच्या फिर्यादी नुसार, त्यांचा मुलगा नरेश हा शुक्रवारी मध्यरात्री मित्रांशी गप्पा मारत होता. त्या वेळी गाड्या तोडफोडीच्या कारणावरून आरोपी सुभाष शिंदे याच्याशी त्यांचा वाद झाला. त्या वेळी आरोपी सुभाष याने नरेशच्या दिशेने सिमेंटचा गट्टू फेकून मारला. नरेश याच्या डोक्याला गट्टू लागल्याने तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. नरेश बेशुद्ध पडल्याने त्याचे मित्र पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT