पुणे

पुणे : ‘फर्ग्युसन’मध्ये रस्ते सुरक्षा कक्ष; राज्यातील पहिलेच महाविद्यालय

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: प्रादेशिक परिवहन विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात रस्ते सुरक्षा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहन चालवण्याचा शिकावू परवाना दिला जाणार आहे. असा कक्ष सुरू झालेले फर्ग्युसन हे राज्यातील पहिलेच महाविद्यालय ठरले आहे. रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत पुणे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात बुधवारी (दि.14) झालेल्या कार्यक्रमात कक्षाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या हस्ते झाले.

डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. संजीव भोर, डॉ. राजेंद्र शर्मा, वेस्टर्न इंडिया ऑटोमोटिव्ह असोसिएशनच्या सिमरन कौर आदी या वेळी उपस्थित होते.

वाडकर म्हणाले, 'सर्वांनीच वाहन चालवताना नियम पाळले पाहिजेत. छोट्या चुकांमुळे अपघात होतात. सीटबेल्ट, हेल्मेटचा वापर न चुकता केला पाहिजे. तरुणांकडून वाहनांचा वापर वाढत असल्याने त्यांच्यात रस्ते सुरक्षेविषयी जागरुकता आवश्यकता आहे. 18 वर्षे पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना पालकांकडून वाहन दिले जाते. मात्र, वाहन चालवताना भान राखले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरुकतेसाठी महाविद्यालय, हेच योग्य ठिकाण आहे.' 'या कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकावू परवाना देतानाच रस्ते सुरक्षेविषयी जागृती होईल,' असे डॉ. परदेशी यांनी सांगितले.

राज्यातील महाविद्यालयांतही…
महाविद्यालयात पहिल्यांदाच रस्ता सुरक्षा आणि शिकावू परवाना कक्ष सुरू करण्यात आला आहे. येत्या काळात राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये असे कक्ष सुरू केले जातील. रस्ते सुरक्षेसंदर्भात काम करण्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र समिती हवी. ऑनलाइन पद्धतीने वाहन चालवण्याचा परवाना देत असताना वाहनचालकाकडून नियमांचे पालन अपेक्षित आहे. परवाना मिळवणे सोपे असले, तरी चाचणी अवघड करण्यात आली आहे. परदेशात नियम पाळले जात असल्याने अपघातांचे प्रमाण कमी आहे, असे पाटील यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT