पुणे

रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ठप्प! येरवड्यातील डांबर प्लांट बंदचा परिणाम

अमृता चौगुले

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : येरवडा येथील महापालिकेचा डांबर प्लांट गेल्या आठ दिवसांपासून नादुरुस्त झाल्याने बंद आहे. यामुळे शहरासह उपनगरांतील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम थांबले आहे. हा प्लांट वारंवार नादुरुस्त होत असल्याने महापालिकेने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. आणखीन आठ दिवस तरी हा प्लांट बंद राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहर परिसरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वारंवार होत असलेली खोदाई, काही ठिकाणी रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण कामे सुरू आहेत. असे असताना येरवडा येथील डांबर प्लांट हा गेल्या आठ दिवसांपासून बंद पडला आहे. हा प्लांट मागील पंधरा दिवसांपूर्वी देखील बंद पडला होता. त्यानंतर तो काही काळ सुरू झाला अन् आता पुन्हा बंद पडला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवणे, रस्त्याचे डांबरीकरण करणे, हे सर्व कामे ठप्प झाली आहेत.

येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील जेल रस्ता केबल टाकण्यासाठी खोदण्यात आला आहे. मात्र, डांबर नसल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अर्धवट स्थितीत आहे. अशा अनेक ठिकाणी केबल टाकण्यासाठी परवानगी देण्यात आल्या आहेत. मात्र, संबंधित रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नाही. तसेच शहरातील अनेक रस्त्यांवरदेखील खड्डे आहेत. ते बुजवण्यासाठी डांबर प्लांटवरून डांबर येत असते. मात्र, डांबर मशीन नादुरुस्त झाल्यामुळे हा प्लांट अवस्थेत आहे. तो तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

…मग खोदाई कशासाठी?
येरवडा वाहतूक विभागाचे वाहतूक पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे म्हणाले की, जेल रस्त्यावर केबल टाकण्यासाठी रस्ता मधोमध खोदण्यात आलेला आहे. मात्र, खोदाई केलेला रस्ता पूर्ववत न केल्याने वाहतुकीस अडथळा होत असून, वारंवार कोंडी होत आहे. पथ विभागाकडे याबाबत मागणी केली असता डांबर प्लांट सुरू नसल्याची उत्तर मिळत आहे. डांबर प्लांट सुरूच नव्हता, तर रस्त्यांची खोदाई कशासाठी केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

गेली आठ दिवसांपासून डांबर प्लांट बंद आहे. नादुरुस्त झालेल्या मशिनरीसाठी लागणारे सुट्टे भाग (पार्ट) गुजरातमधून मागवावे लागत आहेत. त्यामुळे उशीर होत आहे. पार्ट आल्यानंतर ते तातडीने बसवण्यात येतील व डांबर प्लांट सुरू करण्यात येईल. मात्र, त्यासाठी आणखीन आठवडाभर तरी वाट पाहावी लागणार आहे.

                                                                        -सपना सहारे,
                                                  शाखा अभियंता, पथ विभाग, महापालिका

SCROLL FOR NEXT