पुणे

पुणे : कल्याणीनगरमध्ये वर्षभरात रस्त्याची दोनदा खोदाई

अमृता चौगुले

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा :  कल्याणीनगर येथील जॉगर्स पार्कसमोरील रस्ता पावसाळी वाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आला होता. हे काम झाल्यानंतर महापालिकेने रस्त्याची दुरुस्ती केली. त्यानंतर काही दिवसांनी ड्रेनेजलाइनच्या कामासाठी हा रस्ता पुन्हा खोदण्यात आल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. तसेच, वर्षभरात हा रस्ता दोनदा खोदल्याने महापालिकेकडून जनतेच्या पैशाचा अपव्यय सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पावसाळ्यात कल्याणीनगरमध्ये पॅलेस व्हिव ते लेन नं. 11 दरम्यान या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यामुळे महापालिकेने या रस्त्यावर वर्षभरापूर्वी पावसाळी लाइन टाकण्याचे काम सुरू केले होते. या वेळी सिद्धार्थ सोसायटी ते पॅलेस व्हिव सोसायटीदरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. हे काम संथ गतीने होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यानंतर हे काम वेगाने पूर्ण करण्यात आले आणि रस्त्याची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. नागरिकांची गैरसोय दूर होते ना होते, तोच काही दिवसांमध्ये महापालिकेने ड्रेनेजच्या कामासाठी हा रस्ता पुन्हा खोदला आहे. हा रस्ता वर्षातून दोनदा खोदल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळी वाहिनी व ड्रेनेजलाइनचे काम एकाच वेळी करण्यात आले नाही, असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच प्रशासनाकडून निधीचा अपव्यय सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

कामांची चौकशी व्हावी
महापालिकेच्या चुकीच्या नियोजनाचा फटका नागरिकांना बसत आहे. एकाच वेळी दोन्ही कामे केली असती, तर दोनदा खोदाई करण्याची वेळ आली नसती. हा रस्ता आता पुन्हा खोदाईमुळे वाहनचालक, नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. महापालिकेने तत्काळ हे काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी. तसेच, रस्ता दोनदा का खोदला याबाबत चौकशी करण्याची मागणी रहिवासी सुधीर गलांडे यांनी केली आहे.

कल्याणीनगरमधील रस्ता ड्रेनेजसाठी का खोदला आहे, याबाबत माहिती घेतली जाईल. हे काम क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावरून सुरू आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.
                                -हेमंत देसाई, अधिकारी, ड्रेनेज विभाग, महापालिका 

SCROLL FOR NEXT