कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा : मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना तसेच नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांकडे रस्ते विकास महामंडळ प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. अडचणींसंदर्भात तक्रार केल्यास थेट केराची टोपली दाखवली जाते. मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सेवा रस्ता नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. महामार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग तयार झाले आहेत. कचरा नेमका कोणी उचलायचा, कचरा टाकणार्यांवर कोण कारवाई करणार, असे अनेक प्रश्न आहेत. कचर्यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे सतत अपघात होत असतात. नुकताच एका रिक्षाला कुत्रे आडवे गेल्याने रिक्षाचा अपघात झाला. या घटनेत रिक्षाचालक व सायकलवरून जाणारा विद्यार्थी जखमी झाला.
काही ठिकाणी फुटपाथ, पेव्हर ब्लॉक व दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचते. काटेरी झाडे व झुडुपे फुटपाथवर आले आहेत. रात्री दुभाजकाचे कर्बस्टोन दिसून येत नाही. त्याला धडकून वारंवार अपघात घडत आहे. बहुतांश पथदिवे चालू होण्याआधीच अनेक खांबे वाकले आहेत. ते कधी कोसळतील याचा भरोसा राहिलेला नाही. कुरकुंभमधील 28 पैकी 7 पथदिव्यांचे खांब पडलेले आहेत. ते पुन्हा उभे करण्यात आले नाहीत. बरेच पथदिवे बंद असतात. विद्युत वाहिन्या दुभाजकावर उघड्यावर आहेत. त्याच्या दुरुस्तीकडे रस्ते विकास महामंडळ लक्ष देत नाही.
कुरकुंभ घाटात संरक्षक कठडे नसल्याने वाहनचालक गोंधळून जातात. अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. भुयारी गटारीचे चेंबर व झाकण तुटले आहे. भागवतवस्ती येथे भुयारी गटार, फुटपाथ, दुभाजक, पथदिव्याची गरज असून, तसा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, वरील सुविधा अद्याप दिल्या नाहीत. कुठे ना कुठे वारंवार अपघात होत आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते दिलीप भागवत यांनी सांगितले.