पुणे : आर. एम. धारीवाल फाउंडेशनच्या वतीने वृक्ष पुनर्रोपण अभियान हाती घेण्यात आले आहे. हा उपक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) यांच्या सहकार्याने राबविला जात आहे.
फाउंडेशनचे मुख्यालय पुणे येथे असून, गेली 40 वर्षे रसिकलाल एम. धारीवाल आणि शोभा आर. धारीवाल यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सातत्याने कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि आपत्ती निवारण, अशा क्षेत्रांमध्ये 50 हून अधिक संस्थांना सोबत घेऊन फाउंडेशन कार्यरत आहे. हाच वारसा फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन पुढे नेत आहेत. वृक्ष पुनर्रोपण अभियानाद्वारे तोडल्या जाणार्या परिपक्व वृक्षांना नवजीवन देणे हे त्यांचे ध्येय आहे.
याबाबत पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी (दि. 25) माहिती देताना फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन म्हणाल्या, ‘आपल्या देशात दररोज रस्ते, बांधकामे आणि इतर विकासकामांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात. अशा वृक्षांना पुनर्रोपणामुळे पुनर्जीवन मिळू शकते. झाडाचे काळजीपूर्वक प्रत्यारोपण केल्यास सुमारे 80 टक्के झाडे व्यवस्थितरीत्या जगतात, अशी खात्री आहे.
त्या पुढे म्हणाल्या, आत्तापर्यंत आरएमडी फाउंडेशनने पुणे रिंगरोड, मुंढवा, घोरपडी आणि बी. जी. शिर्के रोड परिसरात सुमारे 2,100 हून अधिक परिपक्व झाडांचे यशस्वी पुनर्रोपण केले आहे. मात्र, पुढील आव्हाने मोठी आहेत. 172 किमी लांबीच्या पुणे रिंगरोड प्रकल्पामुळे हजारो झाडे तोडली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही झाडे पुनर्रोपणातून वाचविता येऊ शकतात. अधिक माहितीसाठी www.rmdfoundation.org.in/tree- transplantation येथे भेट द्या.
झाड तोडण्याऐवजी त्याचे शेतजमीन, लष्कराची जमीन किंवा जंगलात पुनर्रोपन करून त्याचे संरक्षण करता येते. त्यासाठी त्याचे वय व आकारानुसार 5,000 ते 40,000 रु. इतका खर्च येतो, त्यामुळे या उपक्रमासाठी अर्थसाह्य करा.
किमान दोन वर्षांसाठी एखाद्या पुनर्रोपित झाडाचे पालकत्व स्वीकारा.
तुमच्याकडे जागा किंवा परिसर असल्यास, तुम्ही पुनर्रोपित झाडांना आश्रय द्या.
या चळवळीबद्दल अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोहचवा. समविचारी नागरिकांना जोडा आणि हरित उपक्रमाला बळकटी द्या.