पुणे

खडकवासला : पानशेत, मुठा खोर्‍यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर

अमृता चौगुले

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: पानशेत, मुठा खोर्‍यात शुक्रवारी (दि. 16) सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाल्यांना पूर आले आहेत. पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला धरणांतून जादा पाणी सोडूनही सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. दुपारी एक वाजेपासून खडकवासला धरणातून उच्चांकी 30 हजार 677 क्सुसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.

गुरुवारी (दि. 15) सकाळी सहा ते शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या 35 तासांत टेमघर येथे विक्रमी 105 मिलिमीटर पाऊस पडला. डोंगरी पट्ट्यात संततधारेमुळे पाण्याची आवक सुरू असल्याने सायंकाळपर्यंत खडकवासलातील कायम होता. रायगड जिल्ह्यालगतच्या शिरकोली, माणगाव, दापसरे, तव, दासवे परिसरात सकाळी साडेसहा वाजेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.

परिणामी नद्या, नाल्यांना पूर आला आहे. पानशेत, वरसगाव व टेमघर धरणात पाण्याची आवक दुपटीने वाढली आहे. धरणातील जादा पाणी सोडण्यासाठी जलसंपदा विभागाची धो-धो पावसात धावपळ सुरू आहे. सकाळपासून टप्प्याटप्प्याने पानशेत धरणातून वांजळवाडी सांडव्यातील विसर्गात वाढ करण्यात आली. सांडव्यातून 11 हजार 412 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असल्याने पाण्याच्या लाटा थेट मुख्य पुणे-पानशेत रस्त्याच्या पुलाला धडकत होत्या. वरसगावमधून मुख्य सांडव्यात 6 हजार 894 व वीजनिर्मिती सांडव्यात 570 क्युसेक तर टेमघरमधून 1 हजार 469 क्युसेक पाणी सोडले जात आहे.

डोंगरी पट्ट्यात सूर्यदर्शन नाही
पानशेत, वरसगावच्या डोंगरी पट्ट्यात संततधारेमुळे सकाळपासून सूर्यदर्शन झाले नाही. जनावरेही रानात सोडता आली नाहीत. जुलै महिन्यासारख्या जोरदार सरी कोसळत आहेत.

तोरणा, राजगडला झोडपले
सकाळपासून तोरणा, राजगडसह वेल्हे तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले. धानेप येथील गुंजवणी धरण शंभर टक्के भरून वाहत आहे. गुंजवणीच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. गुंजवणी धरणातून 1780 क्सुसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे कानंदी, गुंजवणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

…. खोर्‍यात नद्यांना पूर
या तिन्ही धरणांतून येणार्‍या तसेच धरण क्षेत्रातील मुठा, आंबी, सिंहगड, खामगाव मावळ, रांजणे खोर्‍यातील पाण्याची आवक वाढल्याने खडकवासला धरणातील सकाळी सात वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात आली. दुपारी एक वाजेपासून सायंकाळपर्यंत 30 हजार 677 क्सुसेक वेगाने मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडले जात आहे. तरीही खडकवासला काठोकाठ 100 टक्के भरले आहे.

गुंजवणी धरण 100 टक्के भरले आहे. धरणक्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार जादा पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

                – दिगंबर डुबल,कार्यकारी अभियंता, निरा देवघर जलसंपदा विभाग

सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत. सकाळपासून पावसाचे प्रमाण वाढल्याने सर्व धरणांत पाण्याची आवक वाढली आहे. वरील तिन्ही धरणांतून सोडण्यात येणार्‍या व धरण क्षेत्रातील पाण्यामुळे खडकवासलातून जादा पाणी मुठा नदीत सोडले जात आहे. पावसाच्या प्रमाणानुसार जादा पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व धरणक्षेत्रातील तसेच नदीकाठच्या शेतकर्‍यांसह रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. धरणे तुडुंब भरल्याने व नद्यांना पूर आल्याने पर्यटक, शेतकर्‍यांनी पाण्यात कोणीही उतरू नये.
                                                         योगेश भंडलकर,
                                  उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

SCROLL FOR NEXT