पुणे; पुढारी वृत्तसेवा : नदी सुशोभीकरण प्रकल्पाच्या 9 व्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, येरवड्याजवळ प्रायोगिक तत्त्वावर 300 मीटर लांबीचे काम जी 20 परिषदेपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम परिषदेतील सदस्यांना दाखवण्यात येणार आहे.
गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातून वाहणार्या मुळा-मुठा नदी काठचे 44 कि.मी लांभीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
या प्रकल्पास 2018 ला मान्यता देण्यात आली असून यासाठी 4 हजार 727 कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्पाचे काम 11 टप्प्यात करण्यात येणार असून 11 पैकी 3 टप्पे प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहे. एका टप्प्यासाठी येणारा 700 कोटी रुपये खर्च महापालिकेच्या निधीतून व उर्वरित खर्च पीपीपी तत्वावर करण्यात येणार आहे.
प्रकल्पाचा टप्पा क्रमांक 9 संगमवाडी ते बंडगार्डन आणि टप्पा क्रमांक 10 बंडगार्डन ते खराडी-मुंढवा या दरम्यानचे काम सुरू आहे. टप्पा क्रमांक 9 चे काम बी.जे. शिर्के कंपनीकडून केले जात आहे. तर टप्पा क्रमांक 10 चे काम पीपीपी तत्वावर सुरू आहे. काम बंडगार्डन येथील गणेश घाट आणि बोट क्लब असे नदीच्या दोन्ही बाजूंनी वेगाने सुरू आहे. यामध्ये टो वॉलसाठी मुरुम भरावा टाकण्याचे काम केले जात आहे.
पुढील महीन्यात पुण्यात जी-20 आंतर-राष्ट्रीय परीषद होत आहे. या परीषदेच्या निमित्ताने विविध देशांतील प्रतिनिधी पुण्यात येत आहे. त्यापूर्वी प्रकल्पांतील प्रायोगिक तत्वावर केले जाणारे गणेश घाट येथील 300 मीटर लांबीचे काम पूर्ण केले जाणार आहे. यासाठी मुरुमचा भराव टाकून, त्यावर मोठे दगड रचून ते लोखंडी जाळीने बांधले जाणार आहेत. या टप्प्यानंतर वृक्षलागवड, पादचारी पथ, सायकल ट्रॅक आदी तयार केले जाणार आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, कुणाल खेमनार, विकास ढाकणे, मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, प्रकल्प विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला यांनी मंगळवारी बंडगार्डन येथे सुरु असलेल्या कामाची पाहणी करून आढावा घेतला.