पुणे

दौंडची वाढती गुन्हेगारी; पोलिसांसमोर आव्हान

अमृता चौगुले

दौंड; पुढारी वृत्तसेवा: दौंड शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शहरात सतत भांडणे, मारामार्‍या होत आहेत. यामध्ये मोठा राजकीय हस्तक्षेप होत आहे. चार दिवसांपूर्वी गस्तीवर असणार्‍या पोलिसांना दौंडमधील दोघांनी गचांडी पकडत मारहाण केली. एवढी मजल गुन्हेगारांची झाली आहे. शहरातील गुंडागर्दीला जर वेळीच आळा घातला नाही, तर दौंडमध्ये मोठे 'गँगवॉर' होण्याची शक्यता आहे. आता सर्व सणवार संपले असून, राजकीय कुरघोड्यांना सुरुवात झाली आहे.

शहरात कुठेही दोन गट एकमेकांना भिडले, तर याचा फायदा राजकीय नेते घेण्यासाठी टपलेले असतात. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यासाठी काही राजकीय नेते पडद्यामागून हालचाली करीत असतात, याचेदेखील पोलिसांनी भान राखणे गरजेचे आहे.
दौंड शहराचे वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांविरोधात खोट्या तक्रारी देणे एखाद्या चांगल्या व्यक्तीवर राजकीय दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करायला लावणे, यामधून तडजोडी करणे, हे काही प्रमुख नेत्यांचे दुकानच झाले आहे.

नव्याने रुजू झालेले पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दौंड शहरातील गुंडांची कुंडली मागवून त्यांना हद्दपार करावे. दौंड शहरात महिलादेखील सुरक्षित नाहीत. शहरातील सरपंचवस्ती येथे मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी पसरली आहे. त्याचा बिमोड पोलिसांनी करावा, असे दौंडकरांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT