पुणे

Rise Up : महिला क्रीडा स्पर्धांचा समारोप; अर्पिता आरडेला दुहेरी मुकुट

Laxman Dhenge

पुणे : 'दै. पुढारी' आयोजित आणि पूना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने महिलांसाठी राईज अप बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अर्पिता आरडे हिने पंधरा वर्षांखालील गटाच्या दुहेरीमध्ये आणि एकोणीस वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट मिळविला. या स्पर्धा पूना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या बॅडमिंटन कोर्टवर संपन्न झाल्या.

या स्पर्धेत नऊ, अकरा, तेरा, पंधरा, सतरा, एकोणीस आणि खुल्या गटातील महिला असे विविध 11 वयोगटांत आणि 20 प्रकारांमध्ये एकूण 602 स्पर्धकांनी विक्रमी सहभाग घेतला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण व्हीटीपी रिअल्टीच्या व्हाईस प्रेसिडेंट काजल शहा, पीडीएमबीएचे कार्यकारी मंडळ सदस्य आणि मुख्य पंच अनिरुध्द जोशी, 'दै. पुढारी'च्या मार्केटिंगचे नॅशनल हेड आनंद दत्ता, मार्केटिंगचे पुणे युनिटप्रमुख संतोष धुमाळ, हरिश हिंगणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

11.51 खेळाडूंनी दाखविलेला भरभरून प्रतिसाद…. प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करण्यासाठी तयारीत असलेले महिला खेळाडू… पंचांमध्ये असलेला उत्साह… अन् करंडक, मेडल व रोख पारितोषिकांची केलेली लयलूट, अशा उत्साही वातावरणामध्ये महिलांच्या राईज अप क्रीडा स्पर्धेच्या सीझन-2 चा समारोप उत्साहात पार पडला. विजयासाठी खेळाडूंची चुरस तर पालक आणि प्रशिक्षकांची वाढलेली धाकधुक, असे चित्र सर्वच स्पर्धांमध्ये पाहायला मिळाले.

या स्पर्धेमध्ये दुहेरीच्या लढतींमध्ये पंधरा वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत अर्पिता आरडे हिने जिज्ञासा चौधरीच्या साथीने अपूर्वा मुसळे आणि पायल पाटील या जोडीचा 15-3, 15-2 अशा फरकाने पराभव करीत विजय मिळविला. 13 वर्षांखालील गटात श्रावणी सुरवसे आणि सोयरा शेलार या जोडीने रुद्राणीराजे निंबाळकर आणि तेजस्वी भुतडा या जोडीचा 15-8, 15-13 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. 17 वर्षांखालील गटात भक्ती पाटील आणि सफा शेख या जोडीने प्रणिका ठाकरे आणि पूर्वा मुंदळे या जोडीचा 15-10, 15-12 असा पराभव करीत विजय मिळविला.

महिलांच्या अंतिम फेरीत अदिती काळे आणि अस्मिता शेडगे या जोडीने अर्पिता आरडे आणि जिज्ञासा चौधरी या जोडीचा 15-4, 13-15, 15-9 असा 2-1 च्या फरकाने पराभव करीत दणदणीत विजय मिळविला. 15 वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत जुई जाधव आणि सोयरा शेलार या जोडीने भक्ती पाटील आणि सफा शेख या जोडीचा 15-6, 15-13 असा पराभव करीत विजय मिळविला. एकेरी गटामध्ये झालेल्या लढतींमध्ये 35 वर्षांखालील महिलांच्या गटा

त अदिती रोडे हिने दीप्ती निगम हिचा 15-3, 15-8 असा, 15 वर्षांखालील गटात सफा शेख हिने भक्ती पाटील हिचा 15-12, 15-13 असा, 40 वर्षांखालील महिलांच्या गटात निधी सक्सेना हिने क्रांती परब हिचा 15-10, 15-13 असा, 13 वर्षांखालील गटाच्या लढतीत ख्याती कात्रे हिने सोयरा शेलार हिचा 15-9, 9-15, 15-8 असा 2-1 च्या फरकाने पराभव केला. 9 वर्षांखालील गटाच्या लढतीत अग्रीम राणा हिने अन्वी कुलकर्णी हिचा 15-4, 15-3 असा, 11 वर्षांखालील गटात कायरा रैना हिने दिविशा सिंग हिचा 15-13, 15-8 असा, 17 वर्षांखालील  गटात युतिका चव्हाण हिने जिज्ञासा चौधरी हिचा 15-12, 15-8 असा, 19 वर्षांखालील गटामध्ये अर्पिता आरडे हिने श्रेया भोसले हिचा 15-11, 15-13 असा, 30 वर्षांवरील महिलांच्या लढतीत मनाली देशपांडे हिने विजयालक्ष्मी सोनवणे हिचा 15-5, 15-10 असा, महिलांच्या लढतीत श्रेया भोसले हिने जिज्ञासा चौधरी हिचा 15-8, 15-13 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.

या राईज अप सीझन-2 साठी माणिकचंद ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून, सहप्रायोजक म्हणून रूपमंत्रा, मीडिया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, फायनान्स पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

राईज अप क्रीडा स्पर्धांच्या सीझन-2 चा समारोप

'दै. पुढारी'च्या वतीने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि खेळाचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने 'राईज अप' पुणे महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या फक्त महिलांसाठी राईज अप या क्रीडा स्पर्धांच्या उपक्रमाच्या सीझन-2 ची सुरुवात या वर्षी सप्टेंबर महिन्यात बुद्धिबळ, कॅरम स्पर्धेने झाली होती. त्यानंतर महिलांच्या जिल्हास्तरीय कुस्ती, जलतरण, अ‍ॅथलेटिक्स, टेबल टेनिस, कबड्डी आणि बॅडमिंटन स्पर्धाही उत्साहात पार पडल्या असून, राईज अप महिलांच्या क्रीडा स्पर्धांच्या सीझन-2 चा समारोप झाला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची केवळ महिलांसाठी स्पर्धा घेणारा 'दै. पुढारी' हा एकमेव माध्यम समूह आहे.

राईज अप महिलांच्या या स्पर्धेमध्ये 13 आणि 15 वर्षांखालील गटामध्ये सहभागी झाले. या स्पर्धेमध्ये खेळून खूप आनंद झाला आणि त्याचबरोबर अनुभवही चांगला मिळाला आहे. माध्यम क्षेत्रामध्ये 'दै. पुढारी' हे एकमेव वृत्तपत्र आहे, जे मोफत प्रवेश देऊन खेळाडूंना खेळण्याची संधी देते. राज्यामध्ये असे कोणतेही माध्यम नाही जे मोफत प्रवेश देते.

– सोयरा शेलार (राष्ट्रीय बॅडमिंटनपटू)

'दै. पुढारी'च्या वतीने सलग दुसर्‍या वर्षी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, माझी मुलगी भक्ती सलग दुसर्‍या वर्षीही सहभागी झालेली आहे. या स्पर्धेत प्रवेश मोफत ठेवल्याने अनेक खेळाडूंना सहभागी होता आले. त्याचबरोबर खेळाडूंमधील आत्मविश्वास वाढला असून, टॅलेंट स्पर्धकांबरोबर खेळण्याचा अनुभवही मिळत आहे. 'दै. पुढारी'च्या या उपक्रमाला पालक म्हणून नेहमीच पाठिंबा राहणार असून, आगामी काळात अशा स्पर्धा घेण्यात याव्यात.

– संतोषी प्रकाश पाटील

केवळ महिलांसाठी या स्पर्धा आयोजित करून महिला सशक्तीकरणासाठीचे वेगळे पाऊल टाकले आहे. माझी मुलगी निधी नऊ, अकरा आणि तेरा वर्षांखालील तीनही वयोगटांत सहभागी झाली. इतर स्पर्धांमध्ये प्रवेश फी 800 ते 1000 रुपयांपर्यंत असते. मात्र, 'दै. पुढारी'ने मोफत प्रवेश ठेवून महिलांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या स्पर्धेमुळे मला माझ्या मुलीमधील त्रुटी, तिचा खेळ जास्त जवळून पाहता आला.

– नरेंद्र गायकवाड

SCROLL FOR NEXT