Pune Theatre Pudhari
पुणे

Pune Theatre: पुण्यात बहरली प्रायोगिक नाट्य चळवळ; वर्षभरात होतात किमान 100 ते 300 प्रयोग

छोट्या नाट्यगृहांची संख्या दोनवरून पोहोचली आठवर

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा चव्हाण

पुणे: पुण्यातील प्रायोगिक रंगभूमी सध्या नव्या उमेदीने बहरताना दिसत आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे शहरात वाढलेली प्रायोगिक नाटकांसाठीची छोट्या नाट्यगृहांची (मिनी थिएटर्स) संख्या.

पूर्वी केवळ दोन असलेली ही नाट्यगृहे आता आठवर येऊन पोहोचली असून, प्रत्येक नाट्यगृहात वर्षभरात किमान 100 ते 300 नाट्यप्रयोग होत आहेत. त्यामुळे प्रायोगिक नाट्यप्रयोगांसाठी हक्काची रंगमंचे उपलब्ध झाली असून, प्रायोगिक नाट्यचळवळीला मोठी चालना मिळाली आहे आणि ती अधिक प्रभावीपणे पुढे येत आहे.

सध्या शहरात सुमारे 30 ते 35 नाट्य संस्था आणि जवळपास 50 नाट्यगट कार्यरत आहेत. त्यामुळे पुणे हे प्रायोगिक नाटकांचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. विशेष म्हणजे, केवळ मराठीच नव्हे तर हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा विविध भाषांतील प्रायोगिक नाटकेही पुण्यात सादर होत आहेत. मोठ्या नाट्यगृहांच्या तुलनेत कमी खर्च, प्रयोगशीलतेला मिळणारा वाव, वेगळ्या धाटणीची मांडणी, विषय आणि मर्यादित प्रेक्षकांसमोर थेट सादरीकरण करण्याची संधी ही या वाढीमागील प्रमुख कारणे ठरत आहेत.

याविषयी मुक्त थिएटरचे संस्थापक राहुल लामखडे म्हणाले, प्रायोगिक नाटकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी धायरीत मुक्त थिएटर उभारले आहे. पुण्यात सुमारे 50 प्रायोगिक संस्था कार्यरत आहेत. दररोज किमान दहा नाट्यप्रयोग सादर होत आहेत.

स्वतंत्र नाट्यगृहांची संकल्पना अधिक व्यापक

महाराष्ट्र कल्चरल सेंटरने सुदर्शन रंगमंचने सुरू केलेली प्रायोगिक नाटकांसाठी स्वतंत्र नाट्यगृहांची संकल्पना अधिक व्यापक झाली आहे. ज्योत्स्ना भोळे सभागृह (टिळक रस्ता), डॉ. श्रीराम लागू रंग अवकाश (टिळक रस्ता), द बॉक्स हब (एरंडवणे), मुक्त थिएटर (धायरी), भरत नाट्य मंदिर (सदाशिव पेठ), टिळक स्मारक मंदिरात नाट्यप्रयोग होत आहेत.

छोटी नाट्यगृहे अधिक उपयुक्त

महापालिकेच्या मोठ्या नाट्यगृहांची आसनक्षमता 700 ते 800 पर्यंत आहे. त्याउलट 100 ते 200 आसनव्यवस्था असलेली छोटी नाट्यगृहे अधिक उपयुक्त ठरत आहेत. मोठ्या नाट्यगृहांचे भाडे 15 ते 30 हजार रुपये आहे, तर छोट्या नाट्यगृहांचे भाडे 4 ते 7 हजार रुपयांपर्यंत असल्याने ते प्रायोगिक नाट्य संस्थांना परवडणारे आहे.

गेल्या काही वर्षांत छोट्या नाट्यगृहांची संख्या वाढली आहे. आमच्या ‌‘द बॉक्स हब‌’मध्ये पाच छोटे रंगमंच असून, बॉक्स 1 आणि बॉक्स 2 मिळून गेल्या दोन वर्षात 1000हून अधिक प्रायोगिक नाट्यप्रयोग झाले आहेत. सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नाट्य संस्था, नाट्यगट पुण्यात प्रयोगासाठी येत आहेत. प्रायोगिक नाटकांचा प्रेक्षकवर्ग हा जाणकार आहे, त्यामुळे प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
- प्रदीप वैद्य, संचालक, द बॉक्स हब (कला संकुल)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT