पुणे

गोरखे गुरुजींकडून समाजाला योग्य दिशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

अमृता चौगुले

धायरी : पुढारी वृत्तसेवा :  'सर्वसामान्य कुटुंबातील गोरखे गुरुजी यांनी विज्ञान व आध्यात्मिकतेची सांगड घालत समाजाला योग्य दिशा देण्याचे काम अविरतपणे केले. समाजाची नैतिक दृष्टी कशी वाढेल आणि नव्या पिढीला संस्कार कसे देता येतील, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. हे करीत असताना शेतकर्‍यांच्या शेतजमिनी कशा पिकतील, याकडेही त्यांनी लक्ष दिले असून, त्यांचे हे कार्य महान आहे,' असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यातील कोंभळी (ता. कर्जत) येथील सद्गुरू सुदाम कान्हा गोरखे महाराजांचा सहस्रचंद्र सोहळा पुण्यातील वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात नुकतान पार पडला, त्या वेळी पवार बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार होते. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार चेतन तुपे, अशोक पवार, सूर्यकांत पलांडे, संजय जगताप, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, संजय ऊर्फ बाळा भेगडे, ह.भ.प. भानुदास महाराज तुपे, जगन्नाथ शेवाळे, प्रशांत जगताप, अमित गोरखे आदी या वेळी उपस्थित होते. या प्रसंगी मानपत्र देऊन गोरखे गुरुजी यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. चैतन्य हेवी इक्विपमेंटचे व्यवस्थापकीय संचालक सोमनाथ होळकर, संजय शेवाळे, अरुण कदम, राहुल कोंढाळकर, राहुल रायकर, काका गोरखे आदींनी या सोहळ्याचे संयोजन केले होते. गोरखे गुरुजी म्हणाले, 'शरद पवार यांच्या हस्ते माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा सन्मान होणे हे अभिमानास्पद असून, यामुळे मी धन्य झालो आहे. यातून मला आणखी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.' प्रास्ताविक संजय शेवाळे यांनी केले. सुरेश गोरखे यांनी आभार मानले.

जिवात प्रेम आहे. जिथे जीव आहे, तिथे भगवंत आहे. भगवंत तुमच्यात बघा! करणी, भूतबाधा याला माझा विरोध आहे. श्रद्धा ठेवा; परंतु अंधश्रद्धेला थारा देऊ नका. देव दगडात नसून तो जिवात आहे, हा मंत्र मला बढेबाबांनी दिला. त्यानुसार जीवनकार्य सुरू आहे.
                                                          – सुदाम कान्हा गोरखे महाराज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT