पुणे

कोैतुकास्पद ! स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड 13 व्या स्थानी

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पिंपरी-चिंचवड शहराने देशात 13 वा क्रमांक प्राप्त केला. तर, महाराष्ट्र राज्यात शहर तिसर्‍या स्थानी आहे. गेले दोन वर्षे शहराचा 19 व्या क्रमांक होता. यंदा स्वच्छतेमध्ये थोडी सुधारणा झाली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे व पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता यांनी हा पुरस्कार दिल्ली येथे गुरुवारी (दि.11) स्वीकारला. केंद्रीय विकास नागरी मंत्री हरदिपसिंह पुरी यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा पार पडला. या वेळी आरोग्य विभागाचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता हरविंदर बन्सल व अधिकारी उपस्थित होते.

देशात सन 2016 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियाना सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी शहराचा स्वच्छतेमध्ये नववा क्रमांक आला. त्यानंतर शहर स्वच्छतेमध्ये सातत्याने पिछाडीवर गेले होते. महापालिकेतर्फे विविध पातळ्यांवर जनजागृती व उपक्रम सुरू करुन सामुदायिक व सार्वजनिक स्वच्छतागृह महिला बचत गटांना स्वच्छतेसाठी चालविण्यासाठी दिले. ओला व सुका कचरा वर्गीकरणावर भर दिला. जनजागृती केली. शहराच्या विविध भागात प्लॉगेथॉन मोहीम राबवून कचरा उचलला. सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणार्‍यांवर, थुंकणार्‍यांवर कारवाईसाठी ग्रीन मार्शल पथकाची नेमणूक केली.

स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत देश पातळीवर शहरांच्या स्वच्छतेबाबतचे परीक्षण करण्यात आले. सेवास्तर गुणांक, नागरिकांचा प्रतिसाद आणि कचरा मुक्त, हागणदारीमुक्त शहर या बाबत पथकाकडून परीक्षण करण्यात आले. शहराला प्रथमच कचरामुक्त शहरात पंचतारांकित मानांकन (फाईव्ह स्टार रेटींग) आणि हागणदारीमुक्त शहराचे सर्वोच्च वॉटर प्लसचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात क्रमवारी सुधारावी, यासाठी गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. याला लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच, शहरवासीयांनी सहकार्य केले आहे. त्यामुळेच स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड अव्वलस्थानी आले आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

क्रमाकांत शहराची घसरण थांबली

स्वच्छ सर्वेक्षणात सन 2016 मध्ये शहराचा देशात नववा क्रमांक आला होता. सन 2017 मध्ये शहराचा 72 व्या क्रमांक आला. सन 2018 मध्ये 43 वा, सन 2019 मध्ये 52 वा क्रमांक, 2020 मध्ये 24 वा क्रमांक, सन 2021 मध्ये 19 वा क्रमांक आणि सन 2022 मध्येही 19 वा क्रमांक कायम होता. सन 2023 मध्ये शहर स्वच्छतेमध्ये देशात 13 वा स्थान प्राप्त केले आहे.

सफाई कर्मचार्‍यांचा महत्त्वाचा वाटा

स्वच्छ सर्वेक्षणातील यश हे शहरवासीयांसह आरोग्य, पर्यावरण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विशेष करून सफाई कर्मचार्‍यांचे आहे. आगामी काळात शहर कसे स्वच्छ राहील, याकडे विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे, असे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT