मोशी : गेल्या महिनाभरापासून पिंपरी चिंचवड परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भात खाचरे भरली असून, भात लावणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मोशी, डुडुळगाव परिसरात भात लावणीची लगबग सुरू झाली असून लावणी अंतिम टप्प्यात आली आहे. मोशी हे पिंपरी चिंचवड शहराचे महत्वाचे उपनगर असून, या भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहत आहेत. यामुळे शेती नावालाच शिल्लक राहिली असल्याची खंत व्यक्त होत असते. परंतु, अद्यापही या भागातील काही हाडाच्या शेतकर्यांनी आपल्या मातीशी इमान राखत शेतीची जोपासना कायम ठेवली आहे. इतर खरीप पिकांबरोबरच भात लागवड ही या परिसरात मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यासाठी पेरणी पूर्व मशागतीत भात रोपांचे आवाण करून रोपे तयार करून घेतली होती.
आता पाऊस समाधानकारक झाल्याने या आवाणमधील रोपे तयार करण्यात आलेल्या खाचरांमध्ये लावण्याची लगबग सुरू आहे. मात्र, भात लावणीसाठी मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई भासत आहे कुशल मजूर नसल्याने मोठ्या प्रमाणात भात लागवड करणार्या शेतकर्यांची निराशा होत असून भात लागवडी खालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. यामुळे उरल्या सुरल्या शेतकर्यांना भात लागवडीसाठी परप्रांतीय मजुरांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे लागवडीसाठी खर्च अधिक व त्या तुलनेने उत्पन्न कमी अशी अवस्था झाली असल्याचे शेतकरी सांगतात.
येथील शेतकर्यांकडून जिवाणू खताची बीज प्रक्रिया करुन भाताची रोपे टाकली जातात, असे कृषीमित्र कुंदा वहिले यांनी सांगितले. तसेच, चिखलणी करून आम्ही पारंपरिक पद्धतीने भाताची लागवड करत असल्याचे येथील शेतकरी प्रभाकर वहिले, संभाजी धायरकर, संपत धायरकर, सदाशिव वहिले, तानाजी धायरकर आदी शेतकर्यांनी सांगितले.
परिसरात प्रामुख्याने इंद्रायणी जातीच्या भाताची लागवड केली जात असून, त्या पाठोपाठ आंबेमोहर, साधा
गावरान तांदूळ, कोलम आदी जातीच्या बियाणांना प्राधान्य दिले जाते. असाच पाऊस सुरू राहिल्यास भात लागवड शेतकर्यांच्या पथ्यावर पडणार असून भरघोस पीक येण्याची अपेक्षा आहे. मोशी पंचक्रोशीतील चर्होली,चिखली, डुडुळगाव, वडमुखवाडी, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, मोशीतील सस्तेवाडी, आल्हाटवाडी, बोर्हाडेवाडी, देहू रस्ता आदी भागांमध्ये भात लागवड केली जाते.