नीट पीजीचे सुधारित वेळापत्रक जाहीर; नीट युजीचा निकाल 14 जूनला File Photo
पुणे

NEET PG Exam: नीट पीजीचे सुधारित वेळापत्रक जाहीर; नीट युजीचा निकाल 14 जूनला

3 ऑगस्टला सकाळी 9 ते दुपारी 12:30 दरम्यान परीक्षा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राष्ट्रीय परीक्षा मंडळाने नीट पीजी 2025 च्या सुधारित परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. आता ही परीक्षा 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12:30 या वेळेत एकाच सत्रात घेतली जाणार आहे. त्यासाठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

एनबीईएमएसने लॉजिस्टिक आणि सोयीच्या कारणास्तव परीक्षा केंद्रे आणि शहरांची संख्या वाढवली आहे. इच्छुक उमेदवार 13 जून ते 17 जून दुपारी 3 वाजेपर्यंत natboard. edu.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्यांचे पसंतीचे परीक्षा शहर पुन्हा निवडू शकतील. ही प्रक्रिया प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्त्वावर चालेल. उपलब्ध शहरांची यादी अर्जात दर्शविली जाईल आणि तेथून निवड करावी लागेल. (Latest Pune News)

एनबीईएमएसने स्पष्ट केले आहे की, उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या राज्यात केंद्र वाटप करण्याचा प्रयत्न असेल. परंतु, प्रशासकीय मर्यादांमुळे याची हमी देता येत नाही. जर एखाद्या राज्यात जागा शिल्लक राहिल्या नाहीत, तर इतर राज्यांमध्येही केंद्र वाटप करण्यात येईल. दरम्यान, 2024 मध्ये पहिल्यांदाच नीट पीजी दोन सत्रांमध्ये घेण्यात आली.

ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अडचणी आल्या होत्या. निकालातील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी निकालांमध्ये अन्सर की, रॉ स्कोअर, नॉर्मलाइज्ड स्कोअर आणि प्रतिसादपत्रक जाहीर करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने यावर्षी ही परीक्षा एकाच सत्रामध्ये घेण्याचे आदेश दिले आहेत.

नीट पीजी 2025 चे सुधारित वेळापत्रक

  • परीक्षेचे शहर निवडणे - 13 ते 17 जून

  • परीक्षेच्या शहराचे तपशील प्रकाशित करणे - 21 जुलै

  • अर्जात दुरुस्ती करणे - 20 जून ते 22 जून 2025

  • हॉलतिकीट जाहीर करणे - 31 जुलै 2025

  • परीक्षेची तारीख - 3 ऑगस्ट 2025

  • 3 सप्टेंबर 2025 पर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा

नीट युजीचा निकाल 14 जूनला

वैद्यकीय क्षेत्रात करियर करू इच्छिणार्‍या देशभरातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नीट युजी परीक्षेच्या निकालाच्या तारखेची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने केली आहे. एनटीएने जाहीर केलेल्या माहितीपत्रकानुसार, निकाल 14 जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

एनटीएने 3 जून रोजी नीट युजीची उत्तरसूची जाहीर केली होती. त्यावर 5 जूनपर्यंत विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागवण्यात आले होते. आता या परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी निकाल जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. नीट युजी निकाल एनटीएद्वारे फक्त ऑनलाइन मोडद्वारेच जाहीर केला जाईल. निकाल जाहीर होताच, त्याची लिंक neet. nta. nic.in या अधिकृत वेबसाइटवर सक्रिय केली जाईल. यानंतर, उमेदवार लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करून निकाल तपासू शकतील.

असा पाहता येईल निकाल...

नीट युजी निकाल 2025 तपासण्यासाठी, सर्वप्रथम विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर विद्यार्थ्यांना ताज्या बातम्यांमधील निकालाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. तसेच अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून साइन इन करावे लागेल. यानंतर स्क्रीनवर निकाल उघडेल जिथून विद्यार्थ्यांना तो डाऊनलोड करता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT