पुणे

पालकमंत्र्यांकडून वाहतुकीचा आढावा!

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या मार्गिकेच्या कामासाठी येत्या काही दिवसांत गणेशखिंड रस्त्यावर ठिकठिकाणी 'बॅरिकेडिंग' आणि 'डायव्हर्जन' करण्यात येणार असून, पर्यायी व्यवस्था म्हणून कृषी महाविद्यालयातील रस्ता येत्या आठवड्यात सुरू होणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी (दि. 28) दिली. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पुण्याच्या वाहतुकीशी संबंधित समस्या आणि पायाभूत सुविधांचा 'व्हिडीओ कॉन्फरन्सिंग'द्वारे आढावा घेतला.

यामध्ये पुणे महापालिका, जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस आयुक्त यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. अमितेश कुमार म्हणाले, 'शिवाजीनगर-हिंजवड मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी येत्या काळात गणेशखिंड रस्त्यावर आचार्य आनंदऋषीजी चौक (विद्यापीठ चौक) ते सिमला ऑफिस यादरम्यान कामांचा वेग वाढविण्यात येणार आहे. यामध्ये काही मेट्रो स्थानकांच्या कामांचा समावेश आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग करून रस्ता अडविला जाईल. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत चालण्यासाठी विशेष खबरदार घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली आहे.

वाघोली परिसरात मुख्य रस्त्यावर एका ठिकाणी दोन मीटर अंतरात रस्त्याची अवस्था बिकट आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन रांगा लागतात. संबंधित ठिकाणी रस्त्याची डागडुजी करावी. तसेच, सोलापूर रस्ता आणि नगर रस्त्याला जोडणार्‍या थेऊर फाटा रस्त्यावर दीडशे मीटरच्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी या बैठकीत केली. या बैठकीत पाषाण सूस रस्ता-बाणेरचा जोड रस्ता, नवले पूल परिसर, कात्रज ते मंतरवाडी फाटा आदी रस्त्यांबाबतही चर्चा झाली.

शहरात 2007 मध्ये स्वारगेट-हडपसर आणि स्वारगेट-कात्रज या मार्गावर पथदर्शी बीआरटी प्रकल्प उभारण्यात आला. गेल्या वर्षी स्वारगेट-हडपसर मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील बीआरटी उखडण्यात आली. मात्र, अद्यापही आठशे मीटर अंतरात बीआरटी मार्ग अस्तित्वात आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळेला अपघात होत असतात. पालकमंत्र्यांच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानंतर उरलेली बीआरटीदेखील काढण्याची सूचना महापालिका प्रशासनाला करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT