पुणे

Koregav Bhima : जयस्तंभ परिसरातील सुरक्षेचा आढावा

अमृता चौगुले

कोरेगाव भीमा : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ऐतिहासिक जयस्तंभास शौर्यदिनी (दि. 1 जानेवारी) मानवंदना देण्याच्या कार्यक्रमाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. जयस्तंभ परिसराची पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला. जयस्तंभाच्या परिसरात आवश्यक सोयी-सुविधांसह सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. तसेच आजूबाजूच्या गावातदेखील पोलिस बंदोबस्त नेमण्याची सूचना रितेश कुमार यांनी केली. 1 जानेवारीनिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार्‍या लाखो लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी दिले. या परिसरात तीन हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. या वेळी सहपोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, संभाजी कदम, आर. राजा, रोहिदास पवार, वाहतूक पोलिस उपायुक्त विजय मगर, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ काईंगडे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी या वेळी उपस्थित होते.

जयस्तंभाच्या आत येण्याचे व बाहेर जाण्याचे दोन्ही मार्ग प्रशस्त करा, स्तंभाकडे जाणार्‍या रॅम्पची मागील वर्षीपेक्षा रुंदी वाढवावी, आपत्कालीन मार्ग सज्ज ठेवावेत, कोरेगाव भीमासह आजूबाजूच्या परिसरातदेखील आवश्यक बंदोबस्त नेमण्यात यावा, साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवावी अशा सूचना रितेश कुमार यांनी दिल्या. उपायुक्त शशिकांत बोराटे म्हणाले, एक जानेवारी रोजी जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणार्‍या लाखो अनुयायांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. बंदोबस्तासाठी सुमारे 300 हून अधिक अधिकारी व तीन हजार अंमलदार नेमण्यात आले आहेत.

त्यासोबतच जलदकृती दल (क्यूआरटी), राज्य राखीव दल, बीडीडीएस, दहशतवादविरोधी पथक, विशेष तपास पथके नेमण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी पाच ड्रोन व 200 सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसविण्यात येणार आहेत. पार्किंगसाठी 21 मोकळी मैदाने निश्चित करण्यात आली आहेत. तुळापूर फाट्यापासून विजयस्तंभाकडे येण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वैद्यकीय व पोलिस मदत केंद्र, हिरकणी कक्ष, बेपत्ता नागरिकांसाठी मदत कक्ष तयार करण्यात येणार आहेत. पुस्तक विक्री व भोजन व्यवस्थेसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, बार्टी, आरोग्य विभाग, पीएमपीएल, अग्निशमन दल यांच्यासह विविध विभागाच्या मदतीने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार व सहपोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अप्पर पोलिस आयुक्त, आठ उपायुक्त, 42 सहाय्यक आयुक्त, 88 पोलिस निरीक्षक, 271 सहायक व पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह सुमारे तीन हजाराहून अधिक अंमलदार असा चोख बंदोबस्त या ठिकाणी नेमण्यात येणार आहे

SCROLL FOR NEXT