देशाने आदर्श घ्यावा असे काम ‘महसूल’ने करावे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन file photo
पुणे

देशाने आदर्श घ्यावा असे काम ‘महसूल’ने करावे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

राज्याचा कारभार पारदर्शी आणि गतिमान करण्याचे काम महसूल विभाग करू शकतो.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्याचा कारभार पारदर्शी आणि गतिमान करण्याचे काम महसूल विभाग करू शकतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल, असे काम महसूल विभागाने करावे. पुढील दोन वर्षांत एकाही व्यक्तीची सुनावणी बाकी राहता कामा नये, असे काम करून महसूल विभागाचा देशात आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

पुणे येथे महसूल अधिकार्‍यांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेस अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, जनतेने दिलेली मते ही आम्ही कर्ज समजतो. त्यासाठी जनतेला उत्तरदायी राहणे हे आमचे कर्तव्य आहे. महसूल विभागाने लोकाभिमुख निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कामात आधुनिकीकरण आणि एआयचा वापर झाला तर महसूल विभाग अधिक चांगले काम करत आहे हे लक्षात येईल. सरकारची प्रतिमा चांगली करण्यात आणि पारदर्शी व गतिशील सरकार करण्यामध्ये महसूल विभागाचा महत्त्वाचा वाटा आहे.

बावनकुळे म्हणाले, तलाठ्यासह आयुक्तांपर्यंत आपण सर्व एक परिवार म्हणून काम करायचे आहे. कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी कायम तुमच्या पाठीशी आहे. आपण मिळालेली जबाबदारी ही केवळ जबाबदारी न समजता नावीन्यपूर्ण काम केले पाहिजे. आपल्या काळात एखादे तरी काम चांगले, जनतेच्या हिताचे झाले पाहिजे असा उद्देश ठेवा. अनेक किचकट कायदे सोपे केले पाहिजेत. कायदा करताना विधिमंडळातही महसूल विभागावर विश्वास दाखवला जातो. सर्वसामान्य लोकांची कामे स्थानिक पातळीवरच पार पडली पाहिजेत. यासाठी दोन वर्षात एकही सुनावणी बाकी राहता कामा नये, अशा प्रकारचा संकल्प या कार्यशाळेच्या माध्यमातून करावा.

माध्यमांना सामोरे जाण्याची गरज

बावनकुळे म्हणाले, माध्यमांमध्ये चांगल्या बातम्या येणे आवश्यक आहे. माध्यमांना घाबरू नका. आपण केलेले चांगले काम त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी महिन्यातून किमान एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे. अनेक ठिकाणी प्रवास करून वेगवेगळे अनुभव आणि चांगले काम माध्यमांसमोर मांडा. प्रवास आणि संवाद हीच आपल्या यशाची पुढची पावले आहेत. इतर राज्यांमध्ये काय चालले आहे याचादेखील अभ्यास करावा.

भूमी अभिलेख बोधचिन्हाचे उद्घाटन

कार्यक्रमावेळी भूमी अभिलेख बोधचिन्हाचे उद्घाटन करण्यात आले. त्याबरोबरच इप्सित, तीस भू प्रणाम केंद्र, ई मोजणी व्हर्जन टू आणि महाखनिज ऑटो या प्रकल्पांचेही उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले तर पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आभार मानले.

शेतकर्‍यांना रस्ता, पाणी, वीज द्या

भविष्यात शेतकर्‍यांना रस्ता, पाणी आणि वीज मिळाली पाहिजे. या गोष्टी मिळत नसल्यानेच 50 एकरचा मालक असलेला शेतकरी हा चपराशाचे काम करतो. जर शेतकर्‍यांना रस्ता, पाणी, वीज मिळाली तर पुढच्या काळात एकही आत्महत्या होणार नाही. आपण नव्याने काही योजना आणत आहोत. यामध्ये वाळू धोरण, देवस्थान जमिनी, भोगवटा दोनच्या जमिनी एक करणे, स्वामित्व योजना, पाणंद रस्ते अशा पद्धतीची कामे केली जाणार आहेत. ही कामे करताना अधिकार्‍यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. कोणावरही कारवाई करताना आनंद होत नाही. मात्र खूप चुकीच्या पद्धतीने काम केले तर त्यांच्यावर कारवाई होणार असा इशाराही त्यांनी दिला.

उसनवारी पद्धत बंद करणार

महसूल विभागातील लोक हे इतर विभागांमध्ये घेऊन जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे महसूल विभागातील कामकाजावर अधिक ताण पडतो, यापुढे असे होणार नाही. इतर ठिकाणी पाठवलेल्या लोकांना पुन्हा महसूल विभागामध्ये आणण्याचे काम पुढील काळामध्ये होऊन आस्थापना अधिक सशक्त केली जाईल, असे त्यांनी या वेळी सांगितले. अधिकार्‍यांनी चुकीचे काम अजिबात करू नये. नियमाबाहेर काम असेल तर होणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगा अशा सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT