पुणे

Pune news : दरोडा प्रकरणातील सोन्याचा ऐवज परत

अमृता चौगुले

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  नळावणे (ता. जुन्नर) परिसरात मारहाण करीत सोन्याचे दागिने लुटून नेल्या प्रकरणात अटक केलेल्या चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलेला चार तोळे सोन्याचा ऐवज जुन्नर न्यायालयाचे आदेशानंतर आळेफाटा पोलिसांनी संबंधित महिला फिर्यादीस परत केला आहे. नळावणे परिसरात बेरकीमळा येथे 8 मार्च 2023 रोजी चोरट्यांनी वैशाली दत्तात्रय साबळे यांचे राहते घरी दरोडा टाकून झोपेत असलेल्या वैशाली साबळे व त्यांचे पती दत्तात्रय साबळे यांना बेदम मारहाण करीत त्यांचे अंगावरील मंगळसूत्र, कानातील दागिने, असा चार तोळे सोन्याचा ऐवज तसेच घरातील पाच हजार रुपये लुटून पलायन केले होते.

दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करताना आळेफाटा पोलिस पथकाने शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्यात अटक केलेल्या गणेश सुरेश भोसले (रा. वाळुंज, ता. आष्टी), अजय सादीश काळे व किरण भाऊसाहेब बेंद्रे (दोघे रा. वाळुंज, अहमदनगर) यांना या गुन्हा प्रकरणी येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले. त्यांनी नळावणे परिसरात दरोडा टाकून सोन्याचा ऐवज व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना या प्रकरणात अटक केली. तसेच पोलिसांनी सोन्याचा ऐवज जप्त केला. चोरीस गेलेले सोन्याचे दागिने वैशाली साबळे यांना परत करण्यात आले.

SCROLL FOR NEXT