पुणे

जळोची : निवृत्तांना हवा एसटीचा वर्षाचा मोफत पास

अमृता चौगुले

जळोची; पुढारी वृत्तसेवा : आयुष्यातील जवळपास 30 किंवा 35 वर्षे एसटी महामंडळात सेवा केलेल्या कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर वर्षभराचा मोफत प्रवास करण्याचा पास मिळावा, अशी मागणी कर्मचारी प्रशासनाकडे करत आहेत. परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने निवृत्त कर्मचारी नाराजी व्यक्त करत आहेत. एस.टी.ची आर्थिकस्थिती बिकट असताना एस.टी.ची प्रगती होण्यासाठी व प्रवाशांच्या सुखकर तसेच आरामदायी प्रवासासाठी चालक, वाहक, यांत्रिकी तसेच कार्यालयीन कर्मचारी दिवस-रात्र काम करत असतात.

इतर महामंडळांच्या तुलनेने कमी पगार घेऊन आयुष्यातील जवळपास 30 किंवा 35 वर्षे एसटीच्या सेवेत खर्च करतात. निवृत्तीनंतर एसटीने प्रवास करण्यासाठी फक्त 6 महिन्यांचा पास दिला जातो. शासन 65 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट व 75 वर्षे पूर्ण झालेल्या प्रवाशांना मोफत प्रवासासाठी मुभा देते. समाजातील अनेक घटकांना सवलतीच्या दरात प्रवास घडवून देते. परंतु सेवा केलेल्या निवृत्त कर्मचार्‍यांना फक्त सहा महिने मोफत प्रवासाचा नियम आहे. त्यामुळे नाइलाजाने पुढील सहा महिने तिकीट काढून प्रवास करावा लागतो.

अत्यल्प पेन्शन,आयुष्यभर कमी पगार, सतत प्रवास व रात्रपाळी यामुळे निवृत्तीनंतर चालक व वाहक यांना विविध शारीरिक व्याधी जडतात. टायर, गिअर बॉक्स, स्प्रिंग, इतर अवजड सुटे भाग उचलण्यात आल्याने यांत्रिकी कर्मचारी, तर सततच्या लिखाणाच्या कामामुळे कार्यालयीन कर्मचारीही अनेक व्याधीने ग्रस्त असतात. वैद्यकीय उपचारासाठी त्यांना मोठा खर्च येतो. ज्या क्षेत्रात आयुष्यभर सेवा केली, उमेदीची वर्षे दिली, तेथे वर्षभरासाठी मोफत पास मिळावा, अशी मागणी केली जात आहे. परंतु प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही.

शासन एसटी कर्मचार्‍यांना नेहमीच पगार कमी देते. परंतु निवृत्तीनंतर अनेक कर्मचारी विविध आजारांनी ग्रस्त असल्याने प्रवास करू शकत नाहीत. त्यामुळे प्रवास झाल्यास अत्यल्प प्रमाण असेल. मोफत प्रवास दिल्यास शासनाच्या तिजोरीवर अजिबात भार पडणार नाही. सामाजिक बांधिलकी समजून वर्षभर मोफत प्रवास द्यावा.

                                      राजेंद्र बंडगर, निवृत्त एसटी कर्मचारी.

वापरा व फेकून द्या वृत्तीप्रमाणे शासन एसटी कर्मचार्‍यांना वागणूक देते. त्यामुळे एसटी प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा न धरता न्यायालयीन लढाई लढून न्याय मिळवू.

                                          महेश शिंदे, अध्यक्ष, एसटी संघटना

SCROLL FOR NEXT