खडकवासला: औरंगजेबाचे स्टेट्स मोबाईलवर ठेवल्याने हिंदुत्ववादी संघटनांच्या एक ते दीड हजारांच्या जमावानेराजगड किल्ल्याजवळ असलेल्या साखर येथील प्रार्थनास्थळाची तोडफोड केली. हा प्रकार रविवारी (दि. 2) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांच्यासह पोलिस अधिकारी व सशस्त्र जवान घटनास्थळी पोहचले.
याबाबतची माहिती अशी की, साखर गावातील एका समाजकंटकाने औरंगजेबाचे स्टेट्स मोबाईल फोनवर ठेवल्याने राजगडसह परिसरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
दरम्यान प्रार्थनास्थळाची तोडफोड होण्याच्या काही वेळेपूर्वी रविवारी सायंकाळी वेल्हेचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांनी साखर गावात भेट देऊन दोन्ही समाजाची बैठकही घेतली; मात्र मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते गावात गोळा झाले, त्यानंतर काही क्षणातच गावाच्याबाहेर असलेल्या प्रार्थनास्थळावर जमावाने हल्ला केला. दरम्यान राजगड तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अविनाश भोसले यांनी वेल्हे पोलिसांना निवेदन दिले आहे.
याबाबत वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ म्हणाले, संबंधित व्यक्तीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार तो मानसिक आजारी आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
स्टेट्सचा प्रकार जुनाच
याप्रकरणी पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्टेट्स ठेवण्याचा प्रकार जुना असून काही व्यक्तींनी खोडसाळपणाने तो आता नव्याने व्हायरल केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेची सखोल तपास सुरू आहे. मशिदीची तोडफोड करणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कायदा हातात घेणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
या घटनेची सखोल तपास सुरू आहे. मशिदीची तोडफोड करणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कायदा हातात घेणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.- डॉ. पंकज देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे जिल्हा