पुणे

पुणे : फेरीवाला समिती निवडणुकीचा निकाल जाहीर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहर फेरीवाला समितीच्या रविवारी सुरू झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी रात्री उशीरा संपली. या निवडणुकीच्या रिंगणात असणार्‍या 36 उमेदवारांमधून सातजण विजयी होऊन समितीवर गेले आहेत तर एका महिलेची बिनविरोध निवड झाली आहे. महापालिकेत 2014 पासून राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे.

त्यानुसार शहरात बायोमॅक्ट्रीक सर्वेक्षण करून अ, ब, क, ड, इ अशी व्यावसायिकांची वर्गवारी करून त्यांना प्रमाणपत्र दिले आहे. पथारी व्यावसायिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांना सुविधा देण्यासाठी फेरीवाला समितीची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. केंद्र सरकारने हे धोरण जाहीर केल्यानंतर महापालिकेने 20 सदस्यांची समिती स्थापन करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यात पथारी संघटनांच्या प्रतिनिधींचे 8 सदस्यांची निवडणुकीद्वारे आणि चार सदस्य हे सामाजिक संस्थांचे (एनजीओ) तर उर्वरित महापालिका, पोलिस अधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत.

नगरविकास खात्याच्या आदेशानुसार, महापालिकेकडून निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. निवडून द्यावयाच्या 8 जागांसाठी 50 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाणणी केल्यानंतर 7 अर्ज अवैध ठरले. सुरूवातीस अनुसूचित जमाती राखीव गट या प्रवर्गातून एकही अर्ज प्राप्त झाला नव्हता, मात्र मुदतवाढ दिल्यानंतर तीन अर्ज आले. या तीन अर्जापैकी दोन अर्ज छाणणीमध्ये बाद झाल्याने भीमाबाई लाडके यांची बिनविरोध निवड झाली.

दरम्यान, अर्ज माघारी घेण्याच्या कालावधीत 7 उमेदवारांनी माघार घेतल्याने 7 जागांसाठी 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी रविवारी महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गंत 32 केंद्रांवर मतदान झाले. त्यानंतर सोमवारी घोले रस्त्यावरील आर्ट गॅलरी येथे मतमोजणी झाली. ही मतमोजणी रात्री 1 वाजेपर्यंत चालली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी विजयी 7 उमेदवारांची घोषणा केली.

विजयी उमेदवार, गट व मते
1) सागर सुनील दहिभाते : (सर्वसाधारण गट) , 1538
2) गजानन विठ्ठलराव पवार : (सर्वसाधारण गट), 1437
3) निलम अय्यर : (सर्वसाधारण महिला राखीव गट), 1855
4) कमल जगधने : (अनुसूचित जाती महिला राखीव गट), 2447
5) शहनाज ईस्माईल बागवान :(अल्पसंख्याक महिला राखीव गट), 2981
6) मंदार बंडू धुमाळ : (इतर मागास वर्ग गट) 3209 मतदान
7) ज्ञानेश्वर जगन्नाथ कोठावळे : (विकलांग गट) 3262
8) भीमाबाई लाडके : (अनुसूचित जमाती राखीव गट – बिनविरोध)

SCROLL FOR NEXT