पुणे

पवना, मुळा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पावसामुळे धरणक्षेत्राच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने पवना व मुळा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीतील पाणीपातळीची वाढ लक्षात घेऊन पूरपरिस्थिती उद्भवू शकते. खबरदारी म्हणून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बुधवारी (दि. 2) केले आहे. पवना धरण सध्या 89.82 टक्के भरले आहे. तर मुळशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडले जाणार आहे. पालिका प्रशासनाला सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. मुळशी धरणात पाणीसाठा 479.95 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 84 टक्के आहे. सरासरी आवक आणि उपलब्ध धरण पात्राची क्षमता पाहता धरणाच्या सांडव्यावरून पाणी मुळा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने केली आहे.

मुळा नदी वाकड ते बोपखेल या भागातून वाहते. दापोडी येथे पवना नदी मुळा नदीत विसर्जित होते. त्यामुळे तेथे मोठा फुगवठा तयार होतो. त्यामुळे नदीकाठच्या भागात पाणी शिरण्याचा धोका आहे. त्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे. धरणातील पाणी विसर्गामध्ये आवश्यक कमी व अधिक बदल होऊ शकतो. नदीपात्रात कोणीही उतरू नये. आपले साहित्य अथवा जनावरे असल्यास ते सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, असे आवाहन सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केला आहे.

आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, क्षेत्रीय कार्यालये व इतर संलग्न विभागांनी सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. सर्व परिसराची पाहणी करून महापालिकेने पोलिस प्रशासनाच्या मदतीने संभाव्य पूरस्थितीमध्ये योग्य ती कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांचे धरण धरणप्रमुख, हवामान विभाग, तसेच एनडीआरएफ, लष्कर यांच्याशीही समन्वय साधण्यात आला आहे. पूरबाधित परिसरांमध्ये नागरिकांसाठी महापालिकेच्या शाळांमध्ये मदत शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी स्वच्छता, आरोग्य, सुविधा व जेवणाची व्यवस्थाचे नियोजन आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी पथक नेमण्यात आले आहेत.

वीजवाहक तारा, डीपीपासून दूर रहावे
पावसात रस्त्यावरील वीजवाहक तारा, विजेचे खांब, डी. पी. बॉक्स, फीडर बॉक्स, इत्यादी विद्युत वाहक ठिकाणांच्या संपर्कात येऊ नये. अशा ठिकाणी जनावरे सोडू नये किंवा बांधू नये. औद्योगिक क्षेत्रात उघड्यावर रासायनिक पदार्थांचा साठा करू नये. अशा ठिकाणी पाण्याचा संपर्क आल्यास दुर्घटना संभवू शकतात. त्यापासून नागरिकांनी जपून रहावे, असे आवाहन ओमप्रकाश बहिवाल यांनी केले आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक
मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष – 020-28331111 /67331111. अग्निशमन केंद्र – संत तुकाराम नगर, पिंपरी- 27423333/27422405/9922501475. लांडेवाडी, भोसरी- 669692101/9922501476. सेक्टर क्रमांक 23, प्राधिकरण- 27652066/9922501477. रहाटणी-669693101/9922501478. लक्ष्मीनगर, तळवडे- 27690101/9552523101. जाधववाडी.

SCROLL FOR NEXT