निमोणे: पुण्याच्या चिंचणी (ता. शिरूर), तर अहिल्यानगरमधील बोरी (ता. श्रीगोंदा) या गावांतील नागरिकांना अक्षरश: घोड नदीपात्रातून जा-ये करावी लागते. या नदीतील रस्ता तब्बल सहा महिने पाण्याखाली असतो. त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून पुलाची मागणी होत आहे.
त्याबाबत अद्यापही निर्णय होत नसल्याने दोन्ही गावांसह परिसरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आणखी किती दिवस आमची सत्व परीक्षा पाहणार आहात, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी शासनाला उद्देशून केला आहे. (Latest Pune News)
पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक असणाऱ्या चिंचणी (ता. शिरूर) हे गाव घोड धरणामुळे शिरूर, श्रीगोंदा तालुक्यासाठी भगीरथ ठरले आहे. मात्र या गावच्या समस्याकडे प्रशासनाने सातत्याने कानाडोळा केला आहे. चिंचणी हे शिरूरमधील गाव असले तरी व्यापार, उद्योगासाठी येथील नागरिकांचा दैनंदिन संबंध श्रीगोंदा परिसराशी येतो. चिंचण-बोरी नदीपात्रात पूल नसल्यामुळे या नागरिकांचे अतोनात हाल होतात. मागील सत्तर वर्षांपासून या परिसरातील नागरिक चिंचणी-बोरी पुलाची मागणी करत असल्याचे दुर्दैवी वास्तव आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी, श्रीगोंदा शहर, काष्टी बाजारपेठेची गावे म्हणून लौकिकाला आली आहेत. चिंचणी परिसरातील नागरिकांसाठी भौगोलिकदृष्ट्या अतिशय जवळ असणाऱ्या या बाजारपेठा येथील स्थानिक नागरिकांना कायम भुरळ घालतात. मात्र घोड धरणाच्या निर्मितीनंतर चिंचणी आणि बोरी या गावांची मोठी अडचण झाली आहे.
धरण झाले, नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे झाले, मात्र या परिसरातील दळणवळणासाठी पुलाची गरज आहे, याकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे होडी, ट्यूबवरून, लाकडी ओंडके यांचा वापर करून नदीतून प्रवास करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल नेताना, विद्यार्थ्यांसह दैनंदिन व्यवहारासाठी परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊनच पुढे जावे लागत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका उपप्रमुख यांनी अहिल्यानगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांची भेट घेतली. त्यांना येथील या स्थितीबाबत माहिती दिली. धरणासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. मात्र आमची पुलाची मागणी मान्य होत नाही. त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदनही खासदार लंकेंना देण्यात आले.