राजेंद्र खोमणे
नानगाव: दौंड तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. यामध्ये तब्बल 41 ग्रामपंचायती महिला सरपंचांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गावांमध्ये सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या महिलांच्या पतीराजांच्या पायाला भिंगरी आली असून, त्यांनी प्रचार व जनसंपर्काला सुरुवात केली आहे.
ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणार्या या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आत्तापासूनच प्रचारात उतरून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Latest Pune News)
विशेषतः महिलांसाठी आरक्षित ठिकाणी पुरुष उमेदवारांच्या स्वप्नांवर विरजण पडले असले तरी ’बायको सरपंच, आपण कारभारी’ या भावनेने प्रेरित होऊन अनेकांनी आपापल्या पत्नीला सरपंच बनविण्याचा विडा उचलला आहे. या पार्श्वभूमीवर गावागावांत उत्सुकता आणि चुरस निर्माण झाली आहे. अनेक महिला उमेदवार स्वतःचे वेगळेपण दाखवत आहेत. मागील काळात कशा प्रकारची सामाजिक कामे केली, गावासाठी काय योगदान दिले याचे सादरीकरण सुरू झाले आहे. याचबरोबर समोरच्या उमेदवारांवर टीका करत, राजकीय वातावरण तापवले जात आहे.
सोशल मीडियावर प्रचार, जनसंपर्कास सुरुवात
घरातील महिला सरपंच झाली, तरी प्रत्यक्षात सत्ता हातात आपल्याच राहील, या हेतूने पतीराज कंबर कसून प्रचारात उतरले आहेत. काहींनी वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंगही लावायला सुरुवात केली असून, सोशल मीडियावर ’भावी सरपंच’ म्हणून पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत.
या निवडणुकीत बर्याच गावांमध्ये प्रथमच सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे पतीराज गावातील प्रत्येक प्रभागात जाऊन जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील निवडणुकीत नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना मनवणे, विरोधकांच्या विरोधकांना जवळ करणे, मतदारांशी नाळ जोडणे असे सगळे प्रयत्न जोरात सुरू आहेत.
काही गावे निवडणूक काळात ठरणार ‘संवेदनशील’
गावातील काही मंडळी इच्छुक महिला सरपंचांच्या ‘पतीराजां’ना आत्तापासूनच सरपंच म्हणून हाका मारू लागले आहेत. नेटक्या कपड्यांत, व्यवस्थित वावरणार्या या मंडळींना सरपंच झाल्याचा आभासच निर्माण होतोय. तर दुसरीकडे निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसा प्रचाराचा जोर वाढेल. काही गावांमध्ये आतापासूनच तंटे, वाद, सोशल मीडियावरील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, ही गावे निवडणूक काळात संवेदनशील ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.