लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या सुधागड तालुक्यातील मृगगड किल्ल्यावर घसरून पडल्याने जायबंदी झालेल्या अदनान खानला यशस्वी रेस्क्यू करीत सुखरूप खाली आणण्यात सामाजिक संस्था आणि शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना यश मिळाले आहे. या सर्वांनी किल्ल्यावर जाऊन अदनान याला स्ट्रेचमध्ये व्यवस्थित ठेवत त्याला हळूहळू खाली घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात शिवदुर्ग टीमदेखील घटनास्थळी पोचली. या सर्वांनी अदनानला दगड गोट्यातून, अरुंद पाऊलवाटेने, निसरड्या वाटेवरून, सौम्य तीव— चढउताराने अत्यंत काळजीपूर्वक सुखरूप खाली आणले.
खाली आल्यावर गाडीत बसवून अदनान याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले. या संपूर्ण रेस्क्यूमध्ये गुरुनाथ साठलेकर, योगेश उंबरे, योगेश दळवी, राजेंद्र कडू, महेश मसने, सागर कुंभार, प्रवीण देशमुख, सुनील गायकवाड, विजय भोसले, अमोल कदम, विशाल चव्हाण, मोहन पवार, अमोल ठकेकर, चेतन चौधरी, अनिल दळवी, बंटी व भेलीवकर ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.
स्थानिक नागरिक आले मदतीला धावून
अदनान याच्या मित्रांनी महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील भाटीया व ओंकार ओक यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. या दोघांनी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रला फोन करून अपघातग्रस्तांचे गुगल लोकशन व फोन नंबर शेअर केला. शिवदुर्ग रेस्कू टीम लोणावळा येथून निघून रेस्कू करायला वेळ लागणार असल्याने त्यांनी खोपोली येथील अपघातग्रस्तांना मदतीला सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठलेकर यांना त्यांची टीम घेऊन पुढे निघण्यास सांगितले. ही टीम किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भेलीव गावात पोचली. तिथे त्यांच्या मदतीला काही स्थानिक लोकदेखील धावून आले.
पाय घसरल्याने लागला मार
अदनान शफिक खान (38) हा आपल्या इतर दोन मित्रांबरोबर मृगगडावर गेला होता. मात्र त्याठिकाणी अदनान साधारण पाच ते दहा फूट घसरला व त्याचे गुडघे, हात, डोके याला जबर मार लागल्याने तो जायबंदी झाला. अदनानचे वजन जवळपास 103 किलो असल्याने त्याला स्वतःला तेथून किल्ल्याच्या पायथ्याशी चालत येणे शक्य नव्हते व उचलून आणणे थोडे अवघड होते. त्याच्या मित्रांनी मदत करण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही.