पुणे

प्रजनन आरोग्य जागरूकता दिवस : स्थूलतेमुळे प्रजनन आरोग्य बिघडतेय !

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फास्ट फूड, जंक फूडचे अतिरिक्त सेवन, रासायनिक प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा आहारात समावेश, यामुळे स्थूलतेची समस्या दिवसेंदिवस बळावत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होत आहेत. प्रजननाशी संबंधित समस्यांकडे योग्य वेळी लक्ष न दिल्यास वंध्यत्व, हार्मोनसंबंधी दीर्घकालीन समस्या बळावू शकतात, याकडे स्त्रीरोगतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम अर्थात मासिक पाळीतील अनियमितता, अतिरिक्त रक्तस्राव यांसारख्या समस्यांचे निदान करण्यासाठी सोनोग्राफीसारख्या तपासण्या करता येऊ शकतात. वजनावर नियंत्रण आणि औषधोपचार यातून प्रतिबंध करता येऊ शकतो, असे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी सांगितले. प्रजनन अवयवांची स्वच्छता हाही आरोग्यातील महत्त्वाचा घटक मानला जात आहे.
पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोममुळे केवळ शारीरिक, मानसिक आरोग्यावरच नव्हे, तर वंध्यत्व आणि चयापचय क्रियेवरही दुष्परिणाम होतो. बैठी जीवनशैली, कामाचे वाढलेले तास, खाण्याच्या आणि झोपेच्या अनियमित वेळा, अधिक प्रमाणात उच्च-कॅलरीयुक्त अन्न आणि पेयांचे अतिसेवन, ताणतणाव तसेच अनुवंशिक परिस्थिती कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे.

आपल्या आजीची आणि आताच्या स्त्रीची प्रजननसंबंधित परिस्थिती वेगळी आहे. आता लग्नाचे वय वाढले आहे, पर्यायाने गर्भधारणेलाही उशिरा होतो. उतारवयातील आजार कमी वयात होऊ लागले आहेत. त्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब याचे प्रमाण जास्त आहे. जंक फूडमुळे जिभेचे चोचले पुरवले जातात, पोट भरते; मात्र पोषण मिळत नाही. संतुलित आहार आणि व्यायाम हा जीवनशैलीशी संबंधित समस्यांशी सामना करण्याचा एकमेव उपाय आहे. रंगीत भाज्या, डाळी, कडधान्ये, दूध, कच्च्या भाज्या यांचा आहारात समावेश करावा.
                                                       – डॉ. वैजयंती पटवर्धन, स्त्रीरोगतज्ज्ञ

पीसीओएसने ग्रासलेल्या स्त्रियांमध्ये पुरुष हार्मोन जास्त असतात. अशा महिलांमध्ये वजन, इन्सुलिनची पातळी वाढते. पीसीओएसवर उपचार न केल्यास, नंतरच्या आयुष्यात मेटाबॉलिक सिंड्रोम अर्थात उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार अशा जीवघेण्या परिस्थितीचा धोका होऊ निर्माण होऊ शकतो. वैयक्तिक गरजांनुसार व्यायाम, औषधोपचार याबाबत उपाय सुचवले जातात.
                                                      – डॉ. अर्चना महाजन, स्त्रीरोगतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT