पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरतीचा चौकशी अहवाल येत्या 10 मे पर्यंत सादर होणार आहे. या भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या अनेक उमेदवारांनी बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविल्याचे आरोप होत असल्याने महापालिकेने ही चौकशी समिती नेमली आहे. पुणे महापालिकेतील विविध पदांच्या 448 जागांसाठी गतवर्षी भरती राबविली होती. त्यात कनिष्ठ अभियंता पदाचा 135 जागांचा समावेश आहे. त्यासाठी 12 हजारांपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आले होते.
त्यामध्ये 450 जणांची गुणवत्ता यादी प्रशासनाने जाहीर केली होती. कागदपत्रांच्या पडताळणीत पात्र ठरलेल्या 135 जणांची अंतिम निवड करण्यात आली होती. मात्र, या निवड यादीतील काही उमेदवारांबाबत सेवकवर्ग विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने काही उमेदवारांनी तीन वर्षांचा अनुभवाचा पुरावा म्हणून पे स्लीप, अनुभव प्रमाणपत्र यासारखी कागदपत्र बनावट तयार करण्यात आल्याचा आरोप काही उमेदवारांकडून करण्यात आला आहे.
यामध्ये काही पात्र उमेदवारांनी अभियांत्रिकी डिप्लोमाच्या आधारावर नोकरी मिळवताना त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली असल्याची माहिती लपविली. तसेच अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेताना पूर्ण वेळ नोकरी केल्याचा अनुभवाचा दाखला जोडला आहे. यासंबंधीच्या काही तक्रारी प्रशासनाकडे पुराव्यासह आल्या आहेत.
दरम्यान, या भरतीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या असून, याचिकांवर आता 10 जून रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनानेही तीन सदस्यीय चौकशी नेमली आहे. या समितीत शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा परीक्षक अमरिश गालिंदे, सेवकवर्ग विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांचा समावेश आहे.
या समितीकडून आलेल्या तक्रारीवर वैयक्तिक कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. यामध्ये बनावट कागदपत्र सादर केल्याचे स्पष्ट झाल्यास सेवेतून बंडतर्फ केले जाईल. दरम्यान, पालिकेची फसवणूक करणार्यांवर फौजदारी दाखल करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापालिकेकडे अभियंता भरतीप्रकरणी आलेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल 10 मे पर्यंत सादर होईल. त्यात दोषी आढळणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
– रवींद्र बिनवडे,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका