पुणे

पुणे- अहमदनगर महामार्गावरील पाटबंधारे कार्यालयाबाहेर अतिक्रमणांचा विळखा

अमृता चौगुले

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-अहमदनगर महामार्गावरील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या इरिगेशन कार्यालयाबाहेर संरक्षक भिंतीला खेटून अतिक्रमण करण्यात आले आहे. लाखो रुपये किमतीचा हा मोक्याचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न सुरू असून, यामागे कोण आहे? हे अद्याप गुलदस्तात आहे. शिक्रापूर येथे मोठ्या संख्येने निवासी संकुले तसेच प्लॉटिंगमध्ये घरे उभी राहिली आहेत. रांजणगाव गणपती, सणसवाडी येथे मोठ्या संख्येने औद्योगिकीकरण झाले आहे. परंतु, पायाभूत सुविधा पाहता निवासासाठी शिक्रापूरला नागरिक व कामगारवर्गाची पसंती आहे. यामुळे येथील जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. परिणामी, शिक्रापूर येथील मोक्याच्या जागा हडपल्या जात आहेत. पुणे-अहमदनगर महामार्गावरील मलठण फाटा येथे चासकमान इरिगेशनचे कार्यालय व कॉलनी आहे. या इमारतीच्या संरक्षक भिंतीला लागून पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण झाले आहे, तसेच, महामार्गालगत असलेली ड्रेनेज पाइपलाइन भराव टाकून बुजविण्यात आली आहे. याबाबत भीतीपोटी इरिगेशनचे अधिकारी अतिक्रमण काढण्याबाबत कचरत आहेत.

अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावली
पुणे-अहमदनगर महामार्गावरील इरिगेशन कॉलनीला खेटून झालेल्या अतिक्रमणाची दखल सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतली असून, संबंधिताला नोटीस बजाविण्याची प्रक्रिया सुरू आहे. महामार्गालगतचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नसून हे अतिक्रमण काढण्यासाठी बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच पीएमआरडीएचे अधिकारी संयुक्त कारवाई करणार असून, यासाठी शिक्रापूर पोलिसांची मदत घेणार असल्याचे उपअभियंता राहुल कदम यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT