रात्रभरात वीजयंत्रणेची दुरूस्ती पूर्ण Pudhari
पुणे

Mahavitaran News: महावितरणच्या कर्मचाऱ्यांची जिगरबाज कामगिरी! जंगलातील चिखल तुडवून रात्रभरात वीजयंत्रणेची दुरूस्ती पूर्ण

कोल्ह्यांचा हल्ला चुकवला; वेल्हासह 41 गावांचा वीजपुरवठा सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे : कामथडी ते पाबे (ता. राजगड, जि. पुणे) सुमारे 40 किलोमीटर लांब 33 केव्ही पाबे वीजवाहिनीच्या तारा शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास तुटल्या. परिणामी 41 गावे, वाड्या वस्त्यांमधील 6 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मात्र भर पावसात महावितरणच्या अभियंते व कर्मचार्‍यांनी जंगलातील चिखल तुडवत, कोल्ह्यांचा हल्ला चुकवून अनेक धोके पत्करत रात्रभर वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम केले. त्यामुळे शनिवारी (दि. 24) सकाळच्या सुमारास वेल्हा, पाबे, वाजेघर आदींसह 41 गावे व वाड्यावस्त्यांचा वीजपुरवठा सुरळीत झाला.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या नसरापूर उपविभाग अंतर्गत पाबे 33 केव्ही वीजवाहिनीद्वारे राजगड (वेल्हे) तालुक्यातील पाबे 33 केव्ही उपकेंद्रांला वीजपुरवठा करण्यात येतो. या उपकेंद्रांतील चार वीजवाहिन्यांद्वारे वेल्हा गाव, पाबे, दापोडी, विंझऱ, वाजेघर, पाल आदींसह सुमारे 41 गावे व वाड्या वस्त्यांमधील 6 हजार घरगुती, व्यावसायिक व शेतीपंपांना वीजपुरवठा होते. मात्र, 40 किलोमीटर लांबीची व पूर्णतः जंगलात असलेल्या पाबे वीजवाहिनीमध्ये शुक्रवारी (दि. 23) रात्री 11.30 च्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

महावितरणकडून लगेचच बिघाड शोधण्याचे काम सुरु झाले. यात सातारा महामार्गावरील कामथडी येथील निबिड जंगलामध्ये वादळ वार्‍यासह मुसळधार पावसाने चार वीज खाबांवरील तारा तुटल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी वीजतारा तुटल्या त्या ठिकाणी जाणे अतिशय धोक्याचे व जिकरीचे होते. भाताच्या खाचरात व जंगलातील निसरड्या चिखलामुळे चालणे कठीण झाले होते. मात्र उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटूळे, वेल्हा शाखेचे कनिष्ठ अभियंता सचिन कुलकर्णी यांनी समीर मुजावर, सूर्यकांत शिंदे, गणेश शिंदे, राहुल भुरूक, रवी कातुरडे, नीलेश शेंडकर, गणेश गायके, अमोल डांगे, चेतन चोरगे, अमोल रणभोरे या 10 तंत्रज्ञांसह तारांच्या दुरुस्ती काम रात्रीच करण्याचा निर्णय घेतला.

या 12 प्रकाशदूतांनी भर पावसात जंगलातून पायदळ साधनसामग्री नेत मोबाइल, बॅटरीच्या उजेडात तुटलेल्या तारा जोडण्याचे काम मध्यरात्री 12.15 च्या सुमारास सुरू केले. रानडुक्कर व कोल्ह्यांचा वावर असल्याने सगळे सावध होते. तरीही प्रधान तंत्रज्ञ समीर मुजावर यांच्यावर दोन कोल्हे हल्ला करण्याच्या तयारीत असताना दोन-तीन सहकार्‍यांनी आरडाओरड केली. कोल्ह्यांच्या तोंडावर प्रकाशझोत टाकला. त्यामुळे हे कोल्हे पळून गेले.

पाबे वीजवाहिन्याच्या तुटलेल्या तारा जोडण्याचे 90 टक्के काम रात्री पूर्ण झाल्यानंतर सकाळी किरकोळ दुरुस्ती करण्यात आली व पाबे 33 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरू झाला. त्यानंतर या उपकेंद्रातील चार वीजवाहिन्यांद्वारे सकाळी 10.15 च्या सुमारास सर्वच 6 हजार घरगुती, व्यावसायिक व शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. तत्पर ग्राहकसेवेसाठी प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीशी झुंज देत वीजपुरवठा सुरळीत करणार्‍या प्रकाशदूतांचे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT