पुणे

तळेगाव ढमढेरे-कासारी फाटा रस्त्याची दुरुस्ती

अमृता चौगुले

तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा: कासारी फाटा ते तळेगाव ढमढेरे यादरम्यान नवीन तयार करण्यात आलेला रस्ता वाहून गेला होता. याबाबत दै. 'पुढारी'ने दिलेल्या बातमीच्या दणक्याने दखल घेत अखेर तळेगाव ढमढेरे-कासारी फाटा रस्त्याची दुरुस्ती झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील वेळ नदीवर कासारी फाटा या रस्त्यावर रविवारी झालेल्या पावसाने पाण्याच्या प्रवाहात रस्ता आणि त्यावरील पूल वाहून गेला होता. या पुलाखालील नळ्या उघड्या पडल्या होत्या. शिक्रापूर चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिक या रस्त्याचा सर्रासपणे वापर करीत होते. संपर्क तुटलेल्या गावांना दूरवरच्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत होता.

याबाबत दै. 'पुढारी'ने दिलेल्या बातमीची दखल घेत संबंधित ठेकेदाराने उघड्या पडलेल्या नळ्या मुरमाने बुजविल्या आहेत. सध्यातरी वाहतूक सुरळीत झाली आहे. रविवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे रात्रीत पाण्याची पातळी वाढली आणि नवीन झालेला तळेगाव ढमढेरे-कासारी फाट्याकडे जाणारा रस्ता वाहून गेला होता.

दुसर्‍याच दिवशी आठवडे बाजार असल्याने या परिसरातील शेतकरी तसेच व्यापारी यांना दूरच्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा  लागला होता. सध्या तात्पुरत्या स्वरूपात ठेकेदाराने काम भागवले असले, तरी या पुलाचे आणि रस्त्याचे काम चांगल्या प्रतीचे करणे गरजेचे आहे.

SCROLL FOR NEXT