हडपसर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मगरपट्टा चौकात पावसाळी वाहिनी टाकण्यासाठी पदपथाची खोदाई करण्यात आली होती. हे काम पूर्ण झाल्यानंतर पदपथाची दुरुस्ती करण्यात आली असून, पूर्वी आठ फूट रुंद असलेला पदपथ आता चार फुटांचा करण्यात आला असून, तो समतोल नाही. यामुळे नागरिकांना त्यावरून चालता येत नाही. तसेच या पदपथावर जुने ब्लॉक बसवून, त्याची दुरुस्ती केल्याचा देखावा महापालिकेने केला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मगरपट्टा चौकात अनेक दिवसांपासून पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरु होते. या कामासाठी परिसरातील पदपथांची खोदाई करण्यात आली होती. पावसाळी वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने पदपथांच्या दुरुस्तीचे काम हाता घेतले. मात्र, पूर्वी आठ फूट रुंद असलेला हा पदपथ आता चार फुटांचा करण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे पदाचार्यांची गैरसोय होत आहे. यामुळे या पदपथाची रुंदी आठ फूट करण्याची मागणी चंद्रकांत शिंदे व अतुल काळे यांनी केली आहे.
याबाबत सहायक आयुक्त गणेश तारु यांना निवेदन देणार असल्याचेही काळे यांनी सांगितले. पदपथाचे काम करताना जुने ब्लॅाक वापरण्यात आले. तसेच पदपथ समतोल पातळीत नसल्याचे नागरिकांने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, पाऊस नसल्याने पदथाचे काम तातडीने काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, तब्बल दोन महिने पदपथ खोदून ठेवल्याने लोहिया उद्यान व चंद्रमौलेश्वर मंदिरात जाणार्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
लोहिया उद्यान व चंद्रमोलेश्वर मंदिर परिसरात पावसाळी वाहिनी टाकण्यासाठी पदपथाची खोदाई करण्यात आली. मात्र, त्याची दुरुस्ती करताना जुने ब्लॉक बसवून काम केल्याचा देखावा महापालिकेने केला आहे.
-सागर जगताप, अतुल काळे, रहिवासी, हडपसर
पावसाळी वाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. पदपथ दुरुस्तीच्या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याने जुनेच ब्लॉक बसविण्यात आले आहेत. निधी उपलब्ध झाल्यानंतर या पदपथाचे काम नव्याने करण्यात येईल.
-गणेश पुरण, कनिष्ठ अभियंता, ड्रेनेज विभाग, महापालिका
हेही वाचा