पौड; पुढारी वृत्तसेवा: मुळशी पंचायत समिती आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरच्या प्रवेशद्वाराजवळ सिमेंटचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याने दगड-धोंडे, गवत व खाचखळगे या अडचणींचा सामना आता करावा लागणार नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व विकलांग नागरिक यांची समस्या दूर झाली आहे.
मुळशी तहसील कार्यालय व पंचायत समितीमध्ये असलेल्या प्रवेशद्वाराचा अडसर नागरिकांना सतावत होता. जमिनीच्या वर अर्धा-पाऊण फूट प्रवेशद्वाराचा लोखंडी बार येत असल्याने त्यावर उडी मारत सांभाळून प्रवेश करावा लागायचा, तो इतका त्रासदायक होता की साडी परिधान करून येणार्या महिला-भगिनी, वयोवृद्ध नागरिक, विकलांग बांधव यांना ते खूपच अडचणीचे ठरत होते.
मुळशीतील पत्रकारांनी गटविकास अधिकारी संदीप जठार यांना ही अडचण दूर करण्याची विनंती केली होती. जठार यांनी लागलीच यासंदर्भात संबंधितांना सूचना देऊन सिमेंट काँक्रिटीकरण करण्यास सांगितले. दोनच दिवसानंतर हे काँक्रिटीकरण झाल्याने पत्रकारांच्या मागणीला यश आले आहे.