पुणे; पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सवासाठी रस्त्याच्या बाजूस उभा केलेले मंडप तातडीने काढून वाहतुकीला निर्माण होणारा अडथळा दूर करा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने दिला आहे. गणेशोत्सवासाठी महापालिकेने या वर्षी तब्बल 2,353 गणेश मंडळांना परवानगी दिली होती. त्यात, 1826 मंडळे ही 2019 च्या परवाना घेतलेली आहेत, तर यंदा 527 मंडळे नव्याने वाढली आहेत.
त्यांचे मांडव, तसेच रनिंग मांडवांना महापालिकेने 31 सप्टेंबर 2022 ते 10 सप्टेंबर 2022 पर्यंत परवाना दिलेला आहे. परवाने देताना गणेशोत्सव संपल्यानंतर 48 तासांच्या आत मंडळांनी मंडप, रनिंग मंडप, तसेच देखाव्यांचे साहित्य काढून घेण्याचे बंधन घालण्यात आले होते. मात्र, अनेक मंडळांचे मंडप, डेकोरेशन साहित्य, जाहिरात कमानी रस्त्यावर तशाच आहेत. त्यामुळे शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
याबाबत महापालिकेकडे अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत, त्याची दखल महापालिकेने घेतली आहे. मंडळांनी व मंडप व्यावसायिकांनी तातडीने आपले साहित्य काढून घ्यावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा अतिक्रमणविरोधी विभागाने दिला आहे. दरम्यान, गणेश मंडळांनी मंडप, साहित्य काढले आहे किंवा नाही, खड्डे दुरुस्त केले आहेत की नाही, याची पाहणी करण्याचे आदेश अधिकार्यांनी दिली आहेत.
नेमकी मंडळे किती ?
शहरात गणेशोत्सवात महापालिकेने 2353 मंडळांना या वर्षी परवाना दिल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले. त्यात, 1826 ही 2019 ला परवाना घेतलेली मंडळे आहेत. तर, यंदा 527 मंडळे नव्याने वाढली आहेत. मात्र, त्याच वेळी 2019 मध्ये महापालिकेने परवानगी दिलेली 550 मंडळे कमी झाल्याचेही चित्र आहे. 2019 मध्ये पालिकेने शहरात सुमारे 2350 मंडळांना परवाना दिलेला होता. त्यामुळे ही मंडळे गेली कुठे? असा सवालही उपस्थित केला जात आहे.