पुणे

पुणे : चार पॅनेलसह उर्वरित उमेदवार झुंजणार ; मतदानासाठी पुरेसा बंदोबस्त राहणार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्राप्त अर्जातून एकूण 4 पॅनेलला निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले असून, 57 पैकी 42 उमेदवारांचा त्यामध्ये समावेश आहे. तर उर्वरित 15 उमेदवारांनाही शुक्रवारी चिन्हवाटप करण्यात आले. त्यामुळे निवडणुकीसाठी आता चार पॅनेलसह उर्वरित उमेदवारांमध्ये झुंज रंगणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी शुक्रवारी (दि. 21) निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या 18 जागांसाठी 57 उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले. ते म्हणाले, ग्रामपंचायत आणि विकास सोसायटी मतदारसंघात प्रत्येकी 15 उमेदवारांच्या 2 पॅनेलला चिन्हवाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे 15 उमेदवार आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या 15 मिळून एकूण 30 उमेदवारांना पॅनेलनिहाय निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे.

निवडणूक नियमाप्रमाणे 6 उमेदवारांनी एकत्र येत केलेल्या पॅनेलच्या मागणीनुसार 2 पॅनेलला निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये जय शारदा गजानन पॅनेल आणि व्यापारी-अडते, शेतकरी जनशक्ती पॅनेलचा समावेश आहे. या दोन्ही पॅनेलमध्ये दोन आडते-व्यापारी आणि विकास सोसायटी व ग्रामपंचायत गटातील मिळून एकूण 12 उमेदवारांना पॅनेलनिहाय चिन्ह वाटप करण्यात आले. तसेच उर्वरित अन्य व अडते-व्यापारी आणि हमाल-मापाडी मतदार संघातील 5 मिळून असे एकूण 15 उमेदवारांनाही चिन्ह वाटप करण्यात आले आहे.

निवडणूक चिन्हवाटप प्रक्रिया शांततेत पार पडली असून, 28 एप्रिल रोजी मतदान आणि 29 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT