पुणे: शहराजवळील 32 गावे टप्प्या-टप्प्याने महापालिकेत समाविष्ट केली आहेत. या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील एकूण 21 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांचे गेल्या दोन वर्षांपासून स्थलांतर रखडले आहे. जिल्हा परिषदेने पाठविलेला स्थलांतराचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खडकवासल्यापासून फुरसुंगी ते थेऊर, केसनंद पर्यंतच्या भागातील गावांचा 2017 पासून टप्प्याटप्प्याने पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. यात हवेली आणि मुळशी तालुक्यातील गावांचा समावेश आहे.
यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यातील उपकेंद्रे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे करायचे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या संदर्भात समाविष्ट गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांचे स्थलांतर करण्याबाबत 23 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा परिषदेची झालेली सर्वसाधारण सभा आणि 10 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
त्यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने आणि नंतर डीपीसीने ही आरोग्य केंद्रे स्थलांतरीत करण्याबाबत शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेने आरोग्य विभागाच्या सह संचालकांकडे आरोग्य केंद्राच्या स्थलांतराचा प्रस्ताव फेब-ुवारी 2023 मध्ये प्रस्ताव पाठविला होता. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या स्वाक्षरीने हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
पुणे जिल्हा परिषदेने या आरोग्य केंद्रांचे स्थलांतर करण्याबाबत सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही हालचाल झाली नाही. या प्रस्तावाबाबत सरकारने अद्याप कोणतेही पाऊल उचलले नसल्याने आरोग्य केंद्राच्या स्थलांतराचा प्रश्न भिजते घोंगडे तसेच राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
हवेली आणि मुळशीतील 18 उपकेंद्र
सद्य:स्थितीत हवेली तालुक्यातील खडकवासला, फुरसुंगी, वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अनुक्रमे अष्टापूर, थेऊर आणि केसनंद येथे स्थलांतरित करायचे आहेत. तसेच हवेली आणि मुळशी तालुक्यातील 18 उपकेंद्र महापालिकेच्या हद्दीतून स्थलांतरित करायचे आहेत.
स्थलांतरित करण्याचे ठिकाण कंसात
हवेली तालुक्यातील फुरुसुंगी (भावडी), उरळी देवाची (कोरेगाव मूळ), वाघोली (आव्हळवाडी), लोहगाव (वढू (बु)), साडेसतरानळी (कवडी माळवाडी), केशवनगर (वाकवस्ती), मांजरी बु (कोलपेवस्ती), महादेव नगर (लोणीस्टेशन), खडकवासला (श्रीरामनगर), धायरी (घेरा सिंहगड), नर्हे (सोरतपवडी), नांदेड (निरगुडी), नांदोशी (पेठ), शिवणे (बकोरी), उत्तमनगर (कुडजे), आंबेगाव (बुर्केगाव). तसेच मुळशी तालुक्यातील सुस (नांदे), बावधन (भूगाव) येथे करण्यात येणार यावे, असा प्रस्ताव देण्यात आला आहे.
शहराजवळील 32 गावांचा समावेश 2017 पासून टप्प्या-टप्प्याने पुणे महापालिकेत करण्यात आला आहे. मात्र, त्या गावांतील जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्राचे इतरत्र स्थलांतर करण्याबाबत सरकारकडे दोन वर्षापूर्वी प्रस्ताव दिला होता. त्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही, त्यामुळे स्थलांतर रखडले आहे.- डॉ. सचिन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी