पुणे

अनुदानाचा दिलासा; मात्र अतिरिक्त दूध खरेदीचे काय?

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने सहकारी दूध संघामार्फत संकलित होणार्‍या गायीच्या दुधाकरिता शेतकर्‍यांस प्रति लिटरला पाच रुपये अनुदान घोषित केल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, खासगी डेअर्‍यांऐवजी जादा दर मिळण्यामुळे सहकारी संघाकडे दुधाची आवक वाढून अतिरिक्त दुधाच्या खरेदीचा गुंता अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत. शिवाय सहकारी दूध संघांनी घोषित दर शेतकर्‍यांना दिला तरच योजना लागू होईल, अन्यथा ती कागदावरच राहण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

राज्यातील सहकारी दूध संघांनी 3.2 फॅट आणि 8.3 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाकरिता प्रति लिटरला किमान 29 रुपये दूध दर देऊन तो बँक खात्यावर ऑनलाईद्वारे जमा केल्यानंतर अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. गायीच्या दुधाचा सध्याचा खरेदी दर 26 रुपयांपर्यंत खाली आलेला असताना सरकारने घोषित केलेला दर सहकारी संघ देऊ शकतात का? असा प्रश्न अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारने केवळ एकूण दूध संकलनात 28 टक्के वाटा असलेल्या सहकारी दूध संघाना दूध घालणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर प्रतिलिटरला पाच रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. हे करीत असताना दुसरीकडे संकलनात 72 टक्के वाटा असलेल्या खासगी संघांना दूध घालणार्‍या शेतकर्‍यांना अनुदानापासून वंचित ठेवून झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

राज्यात गायीच्या 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाचा खरेदी दर लिटरला 29 रुपये दिला तरच शेतकर्‍यांना पाच रुपये अनुदान दिले जाणार आहे. मुळात त्यापेक्षा अधिक म्हणजे 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ या गुणप्रतिच्या दुधाचे संकलन अधिक होते. म्हणजे त्यानुसार अधिक दर द्यावा लागेल. मुळात घोषित केलेला वाढीव दूध दर देणे सहकारी संघांना अडचणीचे आहे. सहकारी संघांना अतिरिक्त दुधाचा भेडसावणारा प्रश्न आणखी वाढणार आहे. याप्रश्नी लवकरच सहकारी व खासगी डेअर्‍यांची बैठक घेणार आहे.

– गोपाळराव म्हस्के, अध्यक्ष, राज्य दूध उत्पादक प्रक्रिया व कल्याणकारी संघ

दूध उत्पादक शेतकर्‍यांना पाच रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून स्वागतार्ह निर्णय आहे. याकामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शासनाने घेतलेल्या निर्णयाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

– भगवान पासलकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ(कात्रज डेअरी).

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT