पुणे

निवडणूकविषयक तक्रारींसाठी ‘सी-व्हिजिल’ चा दिलासा..

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वतंत्र, पारदर्शक, निष्पक्ष, सर्वसमावेशक निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य असून, भारत निवडणूक आयोगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत अनेक नवनवीन उपयोजके (अ‍ॅप) विकसित करत नागरिकांचा निवडणूक सहभाग वाढविण्यावर भर दिला आहे. त्यापैकीच एक असलेले 'सी-व्हिजिल' हे अ‍ॅप नागरिकांचा निवडणूक सहभाग वाढविण्यास उपयुक्त ठरत आहे. सी-व्हिजील अ‍ॅपवर जिल्ह्यात एकूण 278 तक्रारी दाखल झाल्या असून, सर्व तक्रारींवर कार्यवाही पूर्ण झाली आहे.

लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठी जागरूक मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, असे नेहमीच म्हटले जाते. त्यासाठी नागरिकांचा सहभाग मतदानापुरताच मर्यादित न राहता निवडणूक प्रक्रियवेर लक्ष ठेवण्याचा असावा, असा प्रयत्न भारत निवडणूक आयोगाचा आहे. त्यादृष्टीने आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन करण्यासाठी 'सी-व्हिजील' अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. हे अ‍ॅप म्हणजे नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सादर करण्यासाठी मिळालेले अत्यंत प्रभावी शस्त्र आहे.

अशी करा तक्रार

मतासाठी रोख रकमेची लाच देणे, मोफत वस्तू वाटणे, मद्यवाटप, विहित वेळेनंतर ध्वनिवर्धकांचा वापर, प्रतिबंधित कालावधीत निवडणूक प्रचार आदी विविध स्वरूपाच्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारी या अ‍ॅपवर साईनइन करून करता येतात. याशिवाय नागरिक आपली ओळख जाहीर न करताही तक्रार दाखल करू शकतात. आचारसंहिता भंगाचे पुरावे म्हणून त्या घटनेची छायाचित्रे, व्हिडीओ, ध्वनिफिती (ऑडिओ) अपलोड करावे. आपण ज्या ठिकाणी ही छायाचित्रे, व्हिडीओ घेऊन अपलोड केली ते ठिकाण जीपीएसद्वारे आपोआप जिओ टॅग होते. तसेच, आचारसंहिता भंगाच्या ठिकाणाचा अधिक तपशील भरण्याची सुविधादेखील यात आहे. यानंतर आचारसंहिता भंगाचे स्वरूप ड्रॉपडाऊन यादीतून निवडल्यानंतर संबंधित घटनेचे थोडक्यात वर्णन नमूद करणे आवश्यक असून, तक्रार दाखल (सबमिट) करावी.

'सी-व्हिजिल' अ‍ॅप हे जिल्हा नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी, भरारी पथक, स्थीर संनियंत्रण पथकाशी जोडलेले असते. त्यामुळे तक्रार प्राप्त होताच सर्व संबंधित यंत्रणा गतीने कार्यवाही करते. भरारी पथकाला घटनेच्या ठिकाणी 15 मिनिटांच्या आत पोहोचणे बंधनकारक करण्यात आले आहे. तक्रार दाखल केल्यानंतर 100 मिनिटांच्या आत या तक्रारीवर कार्यवाही करून त्याची माहिती तक्रारकर्त्याला पोहचवली जाते. तक्रारकर्त्याची ओळख गुप्त राखण्यात येत असल्यामुळे त्याला संरक्षण प्राप्त होते, हेदेखील या अ‍ॅपचे वैशिष्ट्य आहे. नागरिकांनी आचारसंहिता भंगाचे प्रकार आढळल्यास 'सी-व्हिजिल'वर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT