कात्रज; पुढारी वृत्तसेवा: कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अडकल्याने अत्यवस्थ झालेल्या युवकाला वेळेत रुग्णालयात पोहचू न शकल्याने जीव गमवावा लागला. त्यामुळे रस्ता रुंदीकरण व वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करणारे महापालिका व वाहतूक पोलिस प्रशासनाविरोधात नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कात्रज- कोंढवा रस्ता तीन महामार्गांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे. दुतर्फा वाढती लोकसंख्या, शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांमुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. दररोज सकाळी व संध्याकाळी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे,
गेल्या आठवड्यात कात्रज-कोंढवा रस्त्यावरील श्रीनिवास संकुल सोसायटी येथील विनोद मांढरे या युवकाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. कुटुंबीयांसह शेजार्यांनी त्यांना तत्काळ भारती हॉस्पिटल येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
मात्र, रस्त्यावरील वाहतूक कोंडीने अवघ्या दीड किलोमीटर अंतरासाठी पाऊण तास वेळ लागला. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी दहा-पंधरा मिनिटे उशीर झाला, असे सांगितल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी नसती, तर जीव वाचला असता, अशी भावना या युवकाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
शहरातील पथदर्शी प्रकल्प म्हणून विकास आराखड्यातील 84 मीटर कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने 72 ब अंतर्गत सुरू केले. मात्र, आवश्यक जागा ताब्यात घेण्याबाबत प्रशासनाला आलेले अपयश आणि राजकीय श्रेयवादामुळे काम रखडले.
महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी या मार्गाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक चुडाप्पा म्हणाले,'कात्रज-कोंढवा रस्त्यावर अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.
वाहतूक विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने प्रत्येक ठिकाणी कर्मचारी देता येत नाही.'
वाहतूक पोलिस राजस चौकापर्यंतच !
शहरातील रस्त्यांवर सकाळी, संध्याकाळी जडवाहनांना बंदी असते. मग, हा नियम कोंढवा रस्त्याला लागू का नाही? माऊलीनगर, गोकुळनगर चौक या भागात वाहतूक पोलिसांची गरज असते. मात्र, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे कर्मचारी राजस चौकाच्या पुढे आणि कोंढवा वाहतूक विभागाचे कर्मचारी शत्रुंजय चौकाच्या पुढे येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गोकुळनगर चौक येथे सांडपाणी वाहिनी तुंबल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे सांडपाणी वाहिनी बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. पावसाळ्यात डांबर प्लांट बंद असल्याने या मार्गावरील खड्डे बुजविण्यात अडथळे येते होते. मात्र, आता हे काम वेगाने सुरू असून ते येत्या चार दिवसांत पूर्ण होईल.
-धनंजय गायकवाड, अभियंता, पथ विभाग