पुणे

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी सुरू

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर प्रदेश, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशांसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत
सुमारे 75 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग एक भरला आहे. विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई महानगर प्रदेश, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येते.

विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळण्यासाठी दहावीच्या निकालापूर्वीच अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार 25 मेपासून नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 75 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 19 हजार 962 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील 9 हजार 398 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग भरला आहे. त्यापैकी 4 हजार 10 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक ऑटो व्हेरिफाईड केला आहे. तर केंद्रावर जाऊन 2 हजार 46 विद्यार्थ्यांनी अर्जाची पडताळणी केली आहे.

निकालानंतर प्रवेश अर्ज भरता येणार

विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर पुढील दोन दिवस नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. तर निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग दोन भरता येईल, तसेच महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येतील. प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती हीींिीं://11 ींहरवाळीीळेप. ेीस. ळप/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT