पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमादरम्यान खारघर येथे किती लोकांना प्राण गमवावे लागले, हे राज्यातील जनतेला सरकार कळू देत नाही. या घटनेत 14 नाही, तर 50 ते 55 लोक मृत्यूमुखी पडल्याचे लोक सांगत आहेत. मात्र, लोकांना सत्य सांगू दिले जात नाही. सत्य सांगणार्यांना धमकवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
खारघर येथील घटनेसंदर्भात माहिती देण्यासाठी लोंढे यांनी सोमवारी पुण्यातील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते म्हणाले, खारघर येथील घटनेचा मुद्दा काँग्रेसने उचलला नसता, तर शासनाने लोकांना कळूसुद्धा दिले नसते. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करून मतदान कसे वाढवता येईल, या उद्देशाने राज भवनमध्ये होणारा कार्यक्रम उघड्यावर उन्हात घेण्यात आला. कार्यक्रम आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी होता की टेंडरमधून पैसे गोळा करण्यासाठी, हे कळत नाही.
कार्यक्रमाचे टेंडर चोवीस तासांत काढून ठरावीक व्यक्तीला दिले गेले. एवढ्या कमी वेळात एजन्सी निवडली गेली. लाईट अँड शेड या कंपनीने 12 तारखेला काम सुरू केले. कामाचे टेंडर 13 तारखेला ओपन झाले. ही कंपनी नरेश म्हस्के यांच्याशी संबंधित असल्याचा आरोपही लोंढे यांनी केला.
सत्य सांगू नये म्हणून सरकार लोकांना धमकावत आहे. एवढी अमानवीय घटना दाबण्याचा निर्लज्जपणा सरकार करत आहे. यावर कडी म्हणजे एक सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे, सरकार याची चौकशी पारदर्शकपणे करू शकत नाही. त्यामुळे न्यायालयीन चौकशी करावी, तसेच दोन दिवसीय विधिमंडळ अधिवेशन बोलवावे, अशी आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले.
भाजप स्वतः नेते तयार करू शकत नाही. त्यामुळे ते अन्य पक्षातील नेत्यांना फोडतात आणि पक्षात घेतात. त्यांचा वापर करून त्यांना संपवतात. आता कोणाला संपायचे आहे, हे ज्याने त्याने ठरवावे. महाविकास आघाडी एकसंघ आहे.
अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस