पुणे

लाल मिरची खातेय भाव; बाजारपेठेतील आवक घटली

अमृता चौगुले

जळोची; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पाऊस, उत्पादन कमी, वाढलेली मागणी लग्नसराई, निर्यातीत वाढ, गतवर्षी झालेली कमी साठवणूक आदी कारणाने लाल मिरची सध्या 'भाव ' खात आहे. बाजारपेठेत लाल मिरचीची आवक घटली आहे. शहरात उन्हाळी कामांना सुरुवात झाल्याने घरगुतीसह कारखानदारांकडून मिरचीला मागणी आहे. त्यातुलनेत आवक नसल्याने मिरचीचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीची चढ्या भावाने विक्री होत आहे.

भुसार बाजारात दररोज तीस किलोंच्या दीडशे ते तीनशे पोत्यांची आवक होत आहे. गतवर्षी लहरी हवामानामुळे उत्पादनात घट होऊन मिरचीच्या साठवणुकीत मोठी घट झाली. स्थानिक बाजारपेठांमध्ये निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी करण्यात येत आहे. त्याचा परिणाम शहरातील आवकेवर झाला आहे. भारतामध्ये आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांत सर्वाधिक लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते.

यंदाही अवकाळी पाऊस, गारपीट तसेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे. दरम्यान, गोदामातील साठा संपल्याने सध्या बाजारात नव्या हंगामातील मिरची दाखल होत आहे. यंदा गुजरात येथूनही मिरची बाजारात येत आहे. मात्र, त्याचेही भाव तेजीत आहेत. लाल मिरचीच्या भावात येत्या काळात मंदी येण्याची सुतरामही शक्यता नाही. ब्याडगी मिरचीच्या भावात गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये लग्नसराई सुरू होते. त्याचप्रमाणे घरगुती मसाला व उन्हाळी पदार्थ गृहिणी तयार करतात. त्यामुळेसुद्धा दरवर्षी उन्हाळ्यात भाव वाढतात.

मिरची प्रकार प्रति किलो भाव
लवंगी 250 ते 350
ब्याडगी 650 ते 1000
संकेशवरी 200 ते 350
गुंटूर 250 ते 315

आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये जोरदार अवकाळी झाल्याने पिकाचे नुकसान झाल्याने आवक कमी झाली. त्यामुळे भाव वाढलेले आहेत व कमी होण्याची शक्यता कमी आहे.

                                                       विजय रसाळ, व्यापारी

SCROLL FOR NEXT