पुणे: प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात 18 ते 19 हजार शिक्षकांची पवित्र पोर्टलमार्फत भरती केली आहे. शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असून, दुसर्या टप्प्यात 10 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात शिक्षण विभागातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
या वेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर, माध्यमिकचे शिक्षण संचालक संपत गोसावी, प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी, योजना संचालक महेश पालकर, ‘बालभारती’चे संचालक कृष्णकुमार पाटील आदी उपस्थित होते.
भुसे म्हणाले, शिक्षक भरतीसाठी संचमान्यता तसेच पटपडताळणी करण्यात येणार आहे. यामधून नेमक्या किती जागा रिक्त आहेत. त्याची निश्चिती करण्यात येईल. यामध्ये पाठीमागील भरतीमधील ज्या लोकांची भरती प्रलंबित आहे. त्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर नवीन शिक्षक भरती करण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा येत्या 20 जानेवारीला सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदांकडील बिंदुनामावलीविषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करून देण्याचे कळविाले आहे.
बिंदुनामावली अपडेट करून पदभरतीच्या कारवाईची सूचना
शिक्षक पदभरतीसाठी सर्व खासगी शैक्षणिक संस्थांना बिंदुनामावली प्रमाणित करण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. पदभरतीची कार्यवाही तत्काळ करायची असल्याने सर्व खासगी संस्थांना सूचना देण्यात याव्यात. ज्या संस्थांची बिंदुनामावली तपासलेली नसेल त्यांची तत्काळ बिंदुनामावली तपासणीची कार्यवाही करावी.
बिंदुनामावली प्रमाणित करण्यासाठी नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तत्काळ विशेष शिबिरांचे आयोजन करून सर्व खासगी शैक्षणिक संस्थांची बिंदुनामावली अद्ययावत करून रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही करण्यासंदर्भात कळविले आहे. त्यामुळे येत्या काळात नवीन 10 हजार शिक्षकांची नेमणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.