सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : वाणेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी कर वसुलीबाबत मोहीम हाती घेतली आहे. ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टी तब्बल 50 लाखांचा आसपास थकीत असून, याबाबत वाणेवाडीच्या 600 ग्रामस्थांना वसुलीबाबत नोटीस पाठवल्या आहेत. ग्रामस्थांनी वेळेत ही थकबाकी भरली नाही, तर थकीत थकबाकीदारांची नावे चौकात फ्लेक्सवर लावण्यात येणार असल्याची माहिती वाणेवाडीच्या सरपंच गीतांजली जगताप यांनी दिली.
ग्रामपंचायतीच्या विकासासाठी सर्वांनी थकबाकी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन गीतांजली जगताप यांनी केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत कर वसुलीबाबत चर्चा होऊन थकबाकीदारांना नोटीस पाठवण्याचे ठरले. त्यानुसार ग्रामपंचायतीने ज्या खातेदारांची पाच हजारांच्या वर थकबाकी आहे, अशा 50 लाख रुपयांच्या आसपास थकबाकी असलेल्या तब्बल 600 ग्रामस्थांना नोटीस पाठवलेल्या आहेत.
याबाबत गीतांजली जगताप म्हणाल्या, दि. 1 एप्रिलपासून नियमानुसार करामध्ये वाढ होणार असून, सन 2011-2012 मध्ये झालेल्या सर्वेक्षणावर करआकारणी केली जात आहे. त्यामुळे नवीन फेर सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानुसार कराची आकारणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गावात 22 कोटी रुपयांची फिल्टर पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, लवकरच सर्व वॉर्डांमधील ग्रामस्थांना स्वच्छ पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.