पुणे

पुणे : माहिती अधिकाराची कामे वेळेत होण्यासाठी अभिलेख कक्ष; तीन कर्मचार्‍यांची नियुक्ती

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: माहिती अधिकारात मागविलेली माहिती वेळेत देण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. विलंब टाळण्यासाठी तत्परतेने माहिती शोधून माहिती मागणार्‍याला देण्यासाठी अभिलेख कक्षाची निर्मिती केली. मार्केट यार्डमध्ये उभारण्यात आलेल्या या कक्षासाठी आता अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कक्षासाठी एक अभिलेख व्यवस्थापन अधिकारी, मदतनीस आणि परिचर, अशा तिघांची नियुक्ती केली आहे. अभिलेख व्यवस्थापन अधिकारी हे जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज बघणार आहेत. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेची 1962 पासूनची कागदपत्रे तसेच वेळावेळी झालेल्या सभा, ठराव, कर्मचारीभरती, महत्त्वाची कागदपत्रे यांची माहिती तसेच नकला वेळेवर उपलब्ध होत नाहीत.

अनेकदा आग लागणे, माहितीची चोरी, फाईल गहाळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कागदपत्रांच्या आधुनिकीकरणाबरोबरच त्याची जपणूक आणि साठवणूक योग्य पद्धतीने करण्यासाठी जिल्हा परिषदेने यापूर्वीच प्रयत्न केले आहेत. जिल्हा परिषदेचे मार्केट यार्ड येथे मोठे गोदाम आणि प्रशस्त मोकळी जागा आहे.

या जागेमध्ये जुने रेकॉर्ड साठविण्यासाठी व्यवस्था केली आहे. त्यासाठी पुरेसा निधी देखील उपलब्ध करून देण्याचा निर्णय
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आहे. कक्षातील अभिलेख आर्थिक वर्षानुसार अ, ब, क वर्गवारीनुसार जतन केले जाणार आहेत. तसेच, मागविलेली माहिती तत्पर मिळण्यासाठी या अभिलेखांचे योग्य व्यवस्थापन झाले, तर माहिती अधिकारात मागविलेली माहिती वेळेत संबंधितांना पुरविणे शक्य होणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

SCROLL FOR NEXT