पुणे: शहरातील खासगी रुग्णालयांच्या तुंबड्या भरण्यासाठी शहरी गरीब योजनेतील डायलिसिसचे दर तब्बल 50 टक्के वाढविण्याची शिफारस दर ठरवण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या समितीने केला आहे.
धक्कादायक म्हणजे, या समितीच्या आधी स्थापन केलेल्या समितीने सुचविलेल्या दरापेक्षा जवळपास दुप्पट दर या नवीन समितीने सुचविले असून, जुन्या समितीच्या अहवालाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब आणि गरजू रुग्णांना ही दरवाढ झाल्यास मोठा फटका बसणार आहे.
शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून महापालिकेकडून गरीब आणि गरजू रुग्णांना दरवर्षी डायलिसिसच्या उपचारांसाठी दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. शहरात महापालिका तसेच खासगी संस्थांच्या माध्यमातून आठ डायलिसिस सेंटरमध्ये तसेच महापालिकेच्या पॅनेलवरील 37 खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिस उपचारांची सुविधा दिली जाते.
मात्र, प्रत्येक रुग्णालयामध्ये डायलिसिसचे दर वेगळे असल्याने त्यामध्ये सुसूत्रता यावी यासाठी आरोग्य विभागाच्या प्रस्तावानुसार महापालिकेने एका समितीची नियुक्ती केली होती. या समितीने संयुक्त प्रकल्पातील रुग्णालयांमध्ये डायलिसिससाठी एक हजार 130 रुपये, तर महापालिकेच्या पॅनेलवरील रुग्णालयांमध्ये जास्तीत जास्त एक हजार 350 रुपये इतका दर निश्चित केला होता.
मात्र, या समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष करत पुन्हा नव्याने समिती नेमण्यात आली. या नवीन समितीने तब्बल 50 टक्के दरवाढ सुचविली आहे. विशेष म्हणजे नवीन समितीने जुन्या समितीच्या शिफारशीकडे दुर्लक्ष करत ही वाढ सूचविल्याने रुग्णांना एक हजार 350 ऐवजी एक हजार 950 रुपये द्यावे लागणार आहेत.
सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी हा प्रकार समोर आणला असून, ही दरवाढ गोरगरीब रुग्णांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी वेलणकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
...असा बसणार गरीब रुग्णांना फटका
शहरात डायलिसिसचे दर हे चारशे रुपयांपासून दोन हजार 354 रुपयांपर्यंत आहेत. डायलिसिससाठी शहरी गरीब योजनेसाठी महापालिका दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करते. त्यानंतर होणारा खर्च संबंधित रुग्णाला भरावा लागतो. समितीने डायलिसिसच्या दरात सुचविलेल्या 50 टक्के दरवाढीमुळे ही रक्कम लवकर संपणार आहे. त्यानंतरचा खर्च रुग्णाला भरावा लागणार आहे. शहरातील काही खासगी हॉस्पिटलच्या सोयीसाठी ही दरवाढ जाणून बुजून करण्यात आली असल्याचा आरोप वेलणकर यांनी केला आहे.