पुणे

खडकवासला : नववर्षाच्या स्वागताला सिंहगडचा घाटरस्ता सज्ज

अमृता चौगुले

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सिंहगड किल्ला सज्ज झाला आहे. त्याची रंगीत तालीम आज रविवारी (18) सुटीच्या दिवशी वनविभागाने घेतली. गडाच्या पायथ्यापासून गडावरील वाहनतळ तसेच गडावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच घाटरस्त्यावरील वाहतूक नियोजनासाठी सुरक्षारक्षकांसह वनखात्याचे कर्मचारी-अधिकारी रस्त्यावर उतरले होते. नवीन वर्षाचे आगमन अवघ्या बारा दिवसांवर आले आहे. त्यामुळे राज्यासह देशभरातील पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ यांच्या देखरेखीखाली आज रविवारी घाटरस्त्यावरील वाहतूक नियोजनाची रंगीत तालीम घेण्यात आली. सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे, सुरक्षारक्षक नितीन गोळे, शांताराम लांघे रमेश खामकरसह तीस सुरक्षारक्षक रस्त्यावर उतरले होते.

गडावरील वाहनतळावर वाहने एका रांगेत उभी करण्यासाठी सहा सुरक्षारक्षक तैनात होते, तर घाटरस्त्यावर ठिकठिकाणी सुरक्षारक्षक धावपळ करत होते. त्यामुळे घाटरस्त्यात वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या पर्यटकांना आज पायबंद बसला. त्यामुळे सिंहगड घाटरस्त्यावर वाहतूक सुरळीत सुरू होती.

वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके म्हणाले, वर्षअखेरीमुळे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.सुटीच्या होणार्‍या गर्दीमुळे वाहतूक व सुरक्षेचे नियोजन केले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे, त्यामुळे आज नियोजनाची रंगीत तालीम घेण्यात आली. प्लॅस्टिकबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला, गडावरील खाऊगल्लीत जवळपास सर्व नोंदणीकृत खाद्यपदार्थ, दही-ताक विक्रेत्यांनी स्टॉल लावले होते.

दिवसभरात दोन्ही मार्गांने गडावर पर्यटकांची चारचाकी 406 व दुचाकी 1109 वाहने गेली. आतकरवाडी व इतर पायी मार्गानेही पर्यटकांची वर्दळ सुरू होती. दिवसभरात दहा ते पंधरा हजारांवर पर्यटकांनी गर्दी केली होती. राजगडावर मात्र आज सकाळपासून पर्यटकांची तुरळक गर्दी होती. दिवसभरात केवळ पाचशेवर पर्यटकांनी हजेरी लावली.

कारवाईनंतर बदलले सिंहगडचे स्वरूप
गेल्या महिन्यात गड व गडाच्या मार्गावरील 138 खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल, हॉटेल वनविभागाने अतिक्रमण कारवाईत जमिनदोस्त केले. कारवाईला आज एक महिना पूर्ण झाला. वर्षाच्या अखेरीस सिंहगडाचे बदललेले स्वरूप पाहून पर्यटक अचंबित होत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT