पुणे : माझ्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती सैन्यदलात नाही, तरीही आम्ही इथवर आलो. एनडीएचे पहिले सत्र जड गेले. मात्र, दुसर्या सत्रात ती कसर भरून काढली. आज अधिकारी म्हणून सैन्य दलात जाताना अभिमानाने ऊर भरून आलाय! हे उद्गार आहेत एनडीएमध्ये रौप्यपदक मिळविलेल्या तिन्ही कॅडेटस्चे. मे महिन्यानंतर यंदा 15 मुलींची दुसरी बॅच अधिकारी म्हणून सैन्य दलात भरती होण्यास सज्ज झाली आहे. यात छत्तीसगडच्या अनन्या बलोनीने रौप्यपदक पटकाविले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 149 तुकडीचा दीक्षांत सोहळा शनिवारी पार पडला. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजय कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी 329 कॅडेटस्ना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या पदवी प्रदान केल्या. यात 72 विज्ञान, 92 संगणक विज्ञान, 54 कला शाखा आणि 111 कॅडेटस्ना बी. टेक पदवी प्रदान करण्यात आल्या. यामध्ये 15 मित्रदेशांच्या, तर 15 महिला कॅडेटस्चा समावेश आहे. या वेळी एनडीए प्रबोधिनीचे कमांडंट व्हाईस अॅडमिरल अनिल जग्गी, प्राचार्य डॉ. विनय दीप उपस्थित होते.
युद्धतंत्र बदलतेय, सायबर स्पेस तंत्रज्ञानाचे आव्हान आहे. त्यामुळे भविष्यातील आव्हानांना सामोरे जाताना आपल्यालाही तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या युद्धनीतीमध्ये शहाणपणा आणि बुद्धिमत्तेने नेतृत्व करेल त्याचाच विजय होईल. त्यासाठी तुम्ही ज्ञानाने सज्ज असणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी यावेळी व्यक्त केले.
शनिवारी प्रामुख्याने रौप्यपदके प्रदान करण्यात आली. यात विज्ञान शाखेतून कार्तिक महेश्वरी, संगणक विज्ञान शाखेतून अनन्या बलोनी, कला शाखेत अनुराग गुप्ता, बी.टेक शाखेतून पुण्याच्या विश्वेश भालेरावला रौप्यपदक प्रदान करण्यात आले. विश्वेशने भारतीय हवाई दलात दाखल होण्याची इच्छा व्यक्त केली, तर अनन्या बलोनी आणि कार्तिक माहेश्वरी यांनी लष्करात करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली.